Advertisement

मेट्रो-3 च्या तक्रारींसाठी काळबादेवीत एमएमआरसीचं कार्यालय


मेट्रो-3 च्या तक्रारींसाठी काळबादेवीत एमएमआरसीचं कार्यालय
SHARES

मेट्रो-3 प्रकल्पातील गिरगाव, काळबादेवी परिसरातल्या प्रकल्पग्रस्तांना आता वांद्र्यातील मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)च्या कार्यालयात जाऊन गाऱ्हाणे मांडण्याची गरज नाहीये. 'एमएमआरसी'ने काळबादेवीत एक कार्यालय उघडले असून तेथेच आता प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी दूर करण्यात येणार आहेत.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 प्रकल्पातील गिरगाव, काळबादेवी आणि आसपासच्या परिसरातील विस्थापितांसह इतर रहिवाशांना छोट्या-मोठ्या तक्रारी, समस्या सोडविण्यासाठी वांद्र्यातील मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)च्या कार्यालयात धाव घ्यावी लागते. आता मात्र दक्षिण मुंबईतील विस्थापित आणि रहिवाशांना वांद्र्यात येण्याची गरज नाही. कारण 'एमएमआरसी'ने गिरगाव, काळबादेवीवासियांच्या समस्यांचे निराकरण तिथल्या तिथे करण्यासाठी काळबादेवीत एक छोटेखानी कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले.

गिरगाव-काळबादेवी परिसरातील 651 रहिवासी मेट्रो-3 मध्ये विस्थापित होणार आहेत. या विस्थापितांचे तिथल्या तिथेच पुनर्वसन करण्याचा निर्णय 'एमएमआरसी'ने घेतलाय. त्यासाठी आराखडाही तयार केलाय. मात्र विस्थापितांचा अजूनही पुनर्वसनातील काही बाबींना विरोध असून त्यांच्या अनेक समस्याही आहेत. या समस्यांसह तक्रारींचे निवारण जागेवरच करण्यासाठी 'एमएमआरसी'ने काळबादेवीत कार्यालय थाटल्याचे म्हटले जातेय.

दरम्यान, या कार्यालयात 'एमएमआरसी'च्या अधिकाऱ्यांसह सल्लागार कंपनीचे अधिकारी उपस्थित राहतील आणि तक्रारींचे निवारण करतील, अशी माहिती 'एमएमआरसी'च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिलीय. विस्थापितांच्या योग्य पुनर्वसनासाठी 'एमएमआरसी' कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चारही भिडे यांनी केलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा