गणेशोत्सवात 'असे' व्हावे प्रसादवाटप


SHARE

गणपतीबाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले अाहेत. गणेशोत्सव मंडळ सजावटीसह, बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत व्यग्र आहेत. पण त्यातही वेळ काढून शुक्रवारी मुंबईतील मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)च्या कार्यालयात हजेरी लावली. कारण गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने प्रसादवाटप काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे आणि हेच प्रसादवाटप कसे करायचे? त्यासाठी काय काळजी  घ्यायची? अन्न सुरक्षा म्हणजे म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने काय काळजी घ्यायची? अशा एक ना अनेक बाबी गणेशोत्सव मंडळांना एफडीएकडून सादरीकरणासह समजावण्यात येणार, ही सूचना देण्यात आल्यामुळे 60 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी एफडीएच्या विशेष कार्यशाळेला हजेरी लावली.


अन्न सुरक्षा कायद्याबद्दल...


अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न शिजवण्यापासून ते अन्नाच्या वितरणापर्यंत, जिथेजिथे अन्नाच्या संबंध येतो तिथे तिथे अन्न सुरक्षा कायदयाचा संबंध येतो. म्हणजे अन्नाचे वितरण प्रसाद म्हणून होत असल्यासही अन्न सुरक्षा कायदा लागू होतो. त्यामुळे प्रसादवाटपासाठीही आता अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्याने गणेशोत्सव मंडळांना एफडीएकडे नोंदणी करत त्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंत हा परवाना घेता येतो. कायद्यानुसार अशी नोंदणी वा परवाना नसेल तर कारवाई करण्याची तरतुदही कायद्यात आहे. मात्र गणेशोत्सव मंडळातील प्रसादवाटप हा धार्मिक आणि संवेदनशील मुद्दा असल्याने एफडीएने आतापर्यंत विनानोंदणी वा विनापरवाना  प्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई केलेली नाही वा यापुढेही कारवाई करण्यात येण्याची शक्यता नाही. मात्र त्याचवेळी गणेशोत्सव मंडळाकडून प्रसादाचे वाटप अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करत व्हावे यादृष्टीने एफडीएकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

त्यानुसार दरवर्षी एफडीए मंडळांना नोंदणी आणि परवान्यासाठी पुढे येण्यास आवाहन करते. त्याचवेळी प्रसादासंबंधी महत्त्वाच्या विषयांसंबंधी मार्गदर्शन मंडळांना केले जाते. तर गणेशोत्सव काळात बाप्पाच्या प्रसादवाटपावर एफडीएची करडी नजरही असते. जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये, असुरक्षित अन्नाचे सेवन होऊ नये. त्यानुसार यंदाही एफडीएने गणेशोत्सव मंडळांना असे मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी एफडीए कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने मंडळांनी हजेरी लावली. एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी यावेळी मंडळांना मार्गदर्शन केले. तर मंडळांनीही प्रसादवाटप करताना योग्य ती काळजी घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सहआयुक्त (अन्न मुख्यालय) चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली आहे.


गणेश मंडळांनो ही काळजी घ्याच...


 • प्रसाद करताना जागा स्वच्छ आणि आरोग्यदायी असावी.
 • प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ परवानाधारक, नोंदणीकृत अन्न विक्रेते वा व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा.
 • प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी आणि झाकण असलेली असावीत.
 • फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी ओळखीच्या, परवानाधारक, नोंदणीकृत फळविक्रेत्याकडूनच करावी.
 • कच्चे, सडलेली किंवा खराब फळांचा वापर करू नये.
 • प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास अपायकारक ठरणार नाही याची खात्री करावी.
 • आवश्यक तेवढाच प्रसाद करावा आणि ताज्या प्रसादाचे वाटप करावे.
 • प्रसाद बनवण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य, पोर्टेबल असावे.
 • प्रसाद उत्पादन करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) इत्यादीचा वापर करणे आवश्यक.
 • हात स्वच्छ धुऊनच प्रसादाचे वाटप करावे.
 • प्रसाद उत्पादन आणि वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा.
 • दूध-दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील असे कमी तापमानावरच साठवणूकीस ठेवावेत.
 • खवा-माव्याचीवाहतुक आणि साठवणूक थंड रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी.
 • जुना, शिळा, अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेला खवा-मावा प्रसादासाठी वापरू नये.
 • अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे आणि त्यांनी दिलेल्या सुचनांचे योग्य ते पालन करणे अनिवार्य राहील.
 • याव्यतिरिक्त अन्न, प्रसाद याबाबत काही संशय असल्यास आपल्या क्षेत्रातील अऩ्न सुरक्षा अधिकारी वा सहायक आयुक्ताशी त्वरीत संपर्क साधावा.
 • हेल्पलाईन क्रमांक-1800222365
संबंधित विषय
ताज्या बातम्या