कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!- राजेश टोपे

एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाली तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कोरोनामुळे कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. आपण आपला मास्क घालावा त्यांना मास्क द्यावा, ठराविक अंतर ठेवावं आणि आपले हात वारंवार धुवावेत. त्यामुळे शिक्षित व्हावं परंतु तो प्रेम-जिव्हाळा अजिबात कमी होता कामा नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला केलं. (dont break relation with covid 19 patient says maharashtra health minister rajesh tope)

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, लोकं भीतीपोटी खूप मोठमोठ्या चुका करीत आहेत. आतापर्यंत ८० वर्षे वयापेक्षा जास्त असलेले किमान ५००० रुग्ण, ९० वर्षे वयापुढील जवळजवळ ६०० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. १०० वर्षे वयाच्या पुढचे ५-१० रुग्णसुद्धा बरे झाले आहेत. एकंदरीत कोरोनाबाधित ९७ टक्के रुग्णांचा मृत्यू होत नाही. आता मृत्यूची टक्केवारी ३ टक्के आहे. एकूणच जर इन्फेक्टेड नसलेले आणि इन्फेक्शन होऊन बरे झालेले एकंदरीत रुग्ण गृहीत धरले, तर मृत्यूचं प्रमाण ०.१ टक्के म्हणजे १००० मध्ये एक मृत्यू होऊ शकतो. 

कोरोनाबाधित रुग्ण १०-१२ दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. ही लक्षणांवर आधारीत उपचार पद्धती आहे. काही मोठी शस्त्रक्रिया वगैरे असत नाही. सायटोकॉईन स्टॉर्म मध्ये आपलं शरीरच आपल्या सेल्सला मारतं. सायटोकॉईन स्टॉर्मचं एक कारण कधीकधी काहीशी भीतीसुद्धा असते. त्यामुळे भीती बाळगू नका.  “जान है तो जहान है” आपण जगलोच नाही तर मग माझ्या बिझिनेसचं काय होईल? माझ्या शेतीचं काय होईल? माझ्या नोकरीचं काय होईल? माझ्या मुलाबाळांचं काय होईल? ही भीतीची अनेक उदाहरणे आहेत. आपण जगलो तरच या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करू शकू हेही लक्षात घ्या.

हेही वाचा - कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

अज्ञान आणि भीतीतून रुग्णांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडतात. या दोन्ही गोष्टींच्या जर मुळाशी गेलो तर एकच आपल्याकडे उत्तर आहे की अज्ञान दूर केले पाहिजे. न घाबरता योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखता येतो, असं राजेश टोपे म्हणाले. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. तरीही या आजाराचा संसर्ग झालेल्यांपैकी ८० टक्क्यांपर्यंत लोकं असिम्प्टोमॅटीक म्हणजे लक्षणे नसलेले असतात. कोरोनाचे तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी १० दिवस सीसीसीमध्ये (कोरोना केअर सेंटर) राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवण्यात येते. त्यासाठी रुग्णांना झिंक, व्हिटामिन सी, पौष्टिक जेवण देण्यात येतं. त्यातूनच रुग्ण बरे होतात.

उर्वरित १५ टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावसं वाटत नाही. काही लोकांना माईल्ड स्वरूपात ऑक्सिजन लागतो. जिथं एसपीओटू (SPO2) ९० पेक्षा खाली गेलेला आहे. याला आपण मध्यम म्हणतो. हे सर्व लोक बरे होतातच. उर्वरित काही २-३ टक्के रुग्ण गंभीर असतात.

शासनाच्या २७०-७५ लॅब व  खासगी ७०-७५ अशा सगळ्या मिळून ३६९ लॅबमधून २४ तासात रिपोर्ट येत आहेत. अँटीजेन टेस्ट आणि अण्टीबॉडी टेस्ट वाढवल्या आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - मुंबई-ठाण्याहून सरकणारा कोरोना संसर्ग चिंताजनक- उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या