४५ वर्षावरील नागरिकांसाठी नवी मुंबई पालिकेचा 'ड्राइव्ह इन लसीकरण' उपक्रम

नवी मुंबईकर ४५ वर्षावरील  नागरिकांना त्यातही विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सुलभ रितीने लस घेता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने ड्राइव्ह इन लसीकरण हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. गाडीत बसल्या बसल्या आरामात लस घेता येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण केंद्रांच्या वाढीसोबतच नागरिकांना विनासायास लस घेता यावी याकरिता विविध सुविधा उपलब्ध करू देण्यात येत असून ड्राइव्ह इन लसीकरण हा त्याचाच एक भाग आहे.  गुरूवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरु झालेल्या ड्राइव्ह इन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी सुरुवातीपासूनच उत्साह दाखवत सीवूड नेरुळ येथील ग्रॅँड सेंट्रल मॉल व वाशी येथील इनॉर्बिट मॉल या दोन ठिकाणी आपापल्या वाहनांतून उपस्थिती दर्शविली.

सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी पार्किंगच्या जागेकडे जाण्याच्या प्रवेशव्दारावर प्रत्येक वाहनाला टोकन क्रमांक दिला जात होता व टोकन क्रमांकानुसार वाहनातील ४५ वर्षावरील व्यक्तींची आधारकार्ड तपासून नोंदणी करण्यात येत होती. त्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना पार्कींगच्या विशिष्ट जागेत निरीक्षणासाठी अर्धा तास थांबविण्यात येत होते. या अर्ध्या तासाच्या निरीक्षण कालावधीत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात होते. त्याचप्रमाणे लस घेतलेल्या व्यक्तीस काही त्रास झाल्यास हॉर्न वाजवून इशारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

ड्राइव्ह इन लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये प्रवीणा खटाव तसेच इनॉर्बिट मॉलमध्ये नरेंद्र सेनगर हे पहिले लस लाभार्थी ठरले. या दोन्ही ठिकाणी प्रथम येणा-या ५० वाहनांनातील ४५ वर्षावरील लाभार्थी नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून ५ वाजेपर्यंत ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये ४५ वर्षावरील ८० तसेच इनॉर्बिट मॉलमध्ये ६६ अशा एकूण १४६ नागरिकांनी लस घेतली आहे.

टोकन नंबर घेणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, लस घेणे व निरीक्षणासाठी अर्धा तास थांबणे ही सर्व प्रक्रिया आपल्या वाहनातून न उतरता बसल्या बसल्या होत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी संतोष व्यक्त केला.


हेही वाचा -

संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!

  1. ‘कोविन-ॲप' नोंदणी आणि प्राप्त 'अपॉइंटमेंट स्लॉट' नुसारच होणार लसीकरण
पुढील बातमी
इतर बातम्या