मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ३५९ दिवसांवर

मुंबईत आता कोरोना नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी तब्बल ३५९ दिवसांवर पोहोचला आहे. तर मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७ हजार ६५० पर्यंत खाली आला आहे. दरम्यान, नववर्षांच्या स्वागताला गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येत आहेत.  

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन  ५०३ रुग्ण आढळले. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २ लाख ८७ हजार ८१६ झाला आहे. तर ११ हजार १९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक बळी मुंबईत गेले आहेत. राज्यात मंगळवारी कोरोनाचे ३१०६ नवे रुग्ण आढळले तर ७५ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत ४८ हजार ८७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३ टक्के एवढे झाले आहे. तर देशात  १९ हजार ५५६ नवीन रुग्ण आढळल्याने  एकूण संख्या एक कोटी ७५ हजार ११६ वर पोहोचली आहे. देशात मृतांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार १११ झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या