Advertisement

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना

या योजनेद्वारे महिलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात येत असून काही महिला प्रवासी, स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना, महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन ८४ व्हॉट्सअ‍ॅप समूह स्थापन केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना अनेकदा लोकल प्रवासावेळी चोरीच्या घटनांचा सामना करावा लागतो. शिवाय, अनेकदा छेडछाडीच्या घटना घडतात. त्यामुळं लोकल प्रवासादरम्यान महिला प्रवाशांची सुरक्षा आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलानं ‘स्मार्ट सहेली’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे महिलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात येत असून काही महिला प्रवासी, स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना, महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन ८४ व्हॉट्सअ‍ॅप समूह स्थापन केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

लोकल प्रवास करताना महिला प्रवाशांना छेडछाड, विनयभंग, मारहाणीच्या घटनांना सामोरं जावं लागतं. शिवाय, आसनांवर अन्य प्रवाशांना बसू न देणे, डब्यात प्रवेश करू न देणे इत्यादी प्रकारही होतात. यासाठी मध्य रेल्वेनं सुरक्षा दलाच्या मदतीनं स्मार्ट सहेली योजना आखली आहे.

लॉकडाऊनच्याआधी मध्य रेल्वे उपनगरी गाड्यांच्या दररोज १७७४ फेऱ्यांतून ४५ लाख प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये १३ लाख महिला प्रवासी आहेत. या महिला प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सेक्टर सहेली’, ‘स्टेशन सहेली’, ‘ट्रेन सहेली’ असे तीन प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

सामाजिक संस्था, महिला प्रवासी संघटनांबरोबरच विविध क्षेत्रांत व कार्यालयात काम करणाऱ्या महिला, रेल्वे सुरक्षा दलातील महिला कर्मचारीही असणार आहेत. सुरुवातीच्या ते शेवटच्या स्थानकापर्यंत दररोज प्रवास करणाऱ्या, गर्दीच्या स्थानकांवर चढणाऱ्या-उतरणाऱ्या महिलांचा यात समावेश असेल. यामध्ये कसारा, टिटवाळा, कल्याण, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कु र्ला, दादर, भायखळा, सीएसएमटी, वडाळा रोड, मानखुर्द, बेलापूर, तुर्भे, पनवेल स्थानकांतून प्रवास करणाऱ्या महिला असतील. त्यांच्याकडून प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या व सूचना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे घेतल्या जातील.

५ महिला सुरक्षा कर्मचारी, गर्दीच्या स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या १५ महिलांचा समावेश असलेले असे २१ व्हॉट्सअ‍ॅप समूह बनवले जाणार आहे. या स्थानकांवर महिला रेल्वे सुरक्षा दलाची २४ तास नजर असेल. सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर २ आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर २ अशा ४ महिला विशेष लोकल  फेऱ्या आहेत. त्यांच्यासाठीच्या ४ समूहांमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीतील २५ महिला प्रवासी असतील. हे गट रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जातील.

७८०१ महिला सदस्यांचा समावेश

एकूण ८४ व्हॉट्सअ‍ॅप समूह बनवले जाणार असून त्याचे ७ हजार ८०१ महिला सदस्य बनण्याची क्षमता आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने अशा ५ हजार महिलांना सदस्यही बनवल्याचीही माहिती दिली. त्यामुळे महिला प्रवाशांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा