मुंबईत प्रथम आरोग्य सेवकांना देणार कोरोना लस

जगभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन केले जात आहे. लवकरच लसही उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचारी, कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. मुंबई महापालिका प्रशासन कोरोना लसीच्या वितरण प्रक्रियेची जोरदार तयारी करत आहे. कोरोना लस आल्यावर मुंबईत प्रथम आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यासाठी प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन आरोग्य शिबीर आयोजित केले जातील. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाईल. तसंच ही लस लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खाजगी दवाखाने, आरोग्य केंद्र यांचे सहकार्य घेणार असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

शासकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तसंच रुग्णालयातील ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत.

मुंबईतील नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. ही लस आतापर्यंत १६३ स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. 


हेही वाचा -

मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त

मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या