चिमुरडीचं ह्रदय ठरलं त्याच्यासाठी जीवदान!

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात बुधवारी 67 वी ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. नाशिकच्या एका 11 वर्षांच्या मुलीचं ह्रदय मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका मुलाला प्रत्यारोपित करण्यात आलं.

नाशिकमध्ये रहाणारी ही मुलगी खेळताना पायऱ्यांवरुन पडली. तिला उपचारांसाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान ब्रेनडेड घोषित केलं. डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी त्या मुलीच्या आई-वडिलांना अवयवदानासाठी तयार केलं आणि त्या मुलीचं ह्रदय प्रत्यारोपणासाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं.  

१ तास ४९ मिनिटांत नाशिक ते मुंबई ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून ह्रदय फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आलं. त्यानंतर तत्काळ जुलै महिन्यापासून ह्रदयाच्या प्रतिक्षायादीत असलेल्या 7 वर्षांच्या मुलावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.

व्यवसायाने शेतकरी असलेल्या मुलीच्या वडिलांनी पुढाकार घेतल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याची प्रतिक्रिया फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

अशा मन:स्थितीत कुटुंबियांनी आपल्या चिमुरडीचे अवयव दान करणं ही मोठी गोष्ट आहे. त्या 11 वर्षीय चिमुरडीने यकृत आणि मूत्रपिंडही दान केले आहे. हृदय प्रत्यारोपित करण्यात आलेल्या सात वर्षीय लहानग्याची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

डॉ. अन्वय मुळये, हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रमुख


हेही वाचा

जे.जे. रुग्णालयात पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या