Advertisement

फोर्टिसमध्ये 4 तासांत दोन ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


फोर्टिसमध्ये 4 तासांत दोन ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
SHARES

अवयवदान एखाद्या व्यक्तीसाठी जीवनदान कसं ठरु शकतं याचा प्रत्यय नुकताच मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात आला. दोन महिलांच्या अवयवदानामुळे तब्बल पाच जणांचा जीवनदान मिळालं आहे. कारण या महिलांच्या इतर अवयवांसोबतच त्यांचं ह्रदयही दान करण्यात आलं. फोर्टिस रुग्णालयात अवघ्या चार तासांमध्ये दोन्ही ह्रदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

पहिलं ह्रदयदान झालं ते पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयातून. पुण्यातल्या एका 22 वर्षीय तरुणीवर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे डोक्यात रक्तस्त्रावर होऊ लागला होता. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केलं. या तरुणीच्या पतीला रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवयवदानाची विनंती केली. डॉक्टरांनी समजावल्यानंतर तरुणीचा पती अवयवदानासाठी तयार झाला.

त्यानुसार या तरुणीचं ह्रदय ग्रीन कॉरिडॉरने पुण्याहून मुंबईला आणण्यात आलं. अवघ्या 1 तास 49 मिनिटांत तब्बल 143 किलोमीटरचा पल्ला गाठत हे ह्रदय मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आलं. घाटकोपरमध्ये रहाणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला हे ह्रदय देण्यात आलं. मे महिन्यापासून हा तरुण कार्डियोमेयोपॅथीच्या आजाराने त्रस्त होता. पण त्याला ह्रदय मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. तसेच या तरुणीचं फुफ्फुस चेन्नईच्या ग्नेनेगल्स ग्लोबल हेल्थ सिटीमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेला देण्यात आलं.

दुसरं ह्रदयदान झालं ते वाशीच्या एमजीएम रुग्णालयात. एका 45 वर्षीय महिलेला रेल्वे अपघात झाल्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र 16 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांच्या परवानगीने या महिलेचं ह्रदय एका 58 वर्षीय व्यक्तीला देण्यात आलं. ही व्यक्ती फोर्टिस रुग्णालयात गेल्या आठवड्याभरापासून अर्जंट लिस्टमध्ये होती.

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि नर्सिंग युनिट यांनी केलेल्या टीमवर्कमुळे दोन्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. सध्या कॅडेव्हर डोनेशनच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कुटुंबियांनी जर अवयवदानासाठी परवानगी दिली नसती, तर या शस्त्रक्रिया शक्य नव्हतं.

डॉ. अन्वय मुळे, कार्डियाक ट्रान्सप्लांट टीम प्रमुख, फोर्टिस रुग्णालय


हेही वाचा

तुमच्या चिमुकल्यालाही ह्रदयरोग होऊ शकतो!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा