इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज


  • इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज
  • इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज
  • इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARE

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदला गुरुवारी दुपारी 1 वाजता सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कार्गोच्या सहाय्याने इजिप्तमधून आलेली इमान अबुधाबीला जाताना मात्र अॅम्ब्युलन्सने गेली. 500 किलो वजनाच्या इमानचं वजन आता 171 किलोग्रॅम एवढं आहे. पुढच्या उपचारांसाठी इमान अबुधाबी येथील बुरजील रुग्णालयात दाखल होणार आहे. इमानला गुरुवारी सैफी रुग्णालयातून मुंबई विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोरने नेण्यात आलं. मुंबई पोलिसांनी तिच्यासाठी खास ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती.

इमान इजिप्तचा पुढील प्रवास एअरबस-300 ने करणार आहे. या प्रवासासाठी इमानच्या गरजेनुसार विशेष सोयी असलेली ही एअरबस आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत इमानला अबुधाबी येथील बुरजील रुग्णालयात दाखल करण्यात येईल. इमानसोबत व्हीपीएस हेल्थकेअरच्या चमूमधील डॉक्टर्स, परिचारिका आहेत. तसंच तिची बहीण शायमासुद्धा सोबत आहे. तसंच सैफी रुग्णालयातील 13 डॉक्टरांचा चमूही इमानसोबत आहे. तसंच इमानच्या सोयीसाठी आपातकालीन रुग्णवाहिकेची ही सोय करण्यात आली आहे. सैफी रुग्णालयाबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसंच इमानला भेटण्यासाठी राज्य आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत, सामाजिक कार्यकर्त्या शायना एन सी आणि बुरजील रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

‘आता इमानचं वजन 171 किलोग्रॅम एवढं आहे. ती बुरजीलला जाण्यासाठी अगदी फिट आहे. काही गैरसमजामुळे इमानच्या डिस्चार्ज पेपर्सवर सह्या केल्या गेल्या नव्हत्या. पण, आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे सैफी रुग्णालय ते विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोर करण्यात आला आहे. त्यामुळे इमान आता अबुधाबीला सुखरुप पोहोचेल’
डॉ.दिपक सावंत, राज्य आरोग्यमंत्री

[हे पण वाचा - राज्य आरोग्यमंत्र्यांनी घेतली इमानची भेट]

‘वकिलांच्या मदतीने होणाऱ्या कागदपत्रांच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे इमानच्या डिस्चार्जला उशिर झाला. इमानची प्रकृती व्यवस्थित आहे. ती प्रवास करू शकते, तिच्या तब्येतीविषयी अफवा पसरवू नका, सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली’
शायना एनसी, सामाजिक कार्यकर्त्या

दरम्यान, इमानला डिस्चार्ज दिल्यानंतर बहिण शायमाने इमानवर उपचार केल्याबद्दल सैफी रुग्णालयाचे आभार मानले. तसेच, अबुधाबी येथील रुग्णालयातील उपचारानंतर इमानला चालणेही शक्य होईल, असे शायमा म्हणाली. याचबरोबर अबुधाबी येथील रुग्णालयातही इमानचे उपचार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)च्या माध्यमातून मोफत करण्यात येणार असल्याची माहिती शायमा हिने दिली.

इमान 11 फेब्रुवारीला मुंबईत उपचारासाठी दाखल झाली होती. 81 दिवसांच्या उपचारानंतर ती 4 मेला अबुधाबीसाठी रवाना झाली आहे. अबुधाबीतल्या उपचारानंतर इमानला चालणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या