राज्य आरोग्यमंत्र्यांनी घेतली इमानची भेट

  Mumbai
  राज्य आरोग्यमंत्र्यांनी घेतली इमानची भेट
  मुंबई  -  

  सैफी रुग्णालयात उपचार घेणारी जगातील सर्वात लठ्ठ महिला इमानची गुरुवारी राज्य आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपण सैफी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बाजूने असल्याचे सांगितले.

  सर्व अहवाल वैयक्तिकरित्या पाहिले आहेत आणि इमानची बहीण शायमा यांनी भारतीय डॉक्टरांवर केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर तिच्या बहिणीने केलेल्या आरोपांची आपण निंदा करतो. डॉ. लकडावाला आणि त्यांच्या पथकाने चांगले काम केले आहे. इमान आता सीटीस्कॅन मशीनमध्ये बसू शकते म्हणजे याचाच अर्थ तिचे वजन खूप कमी झाले आहे.

  - डॉ. दीपक सावंत, राज्य आरोग्यमंत्री

  इमान अहमद हिला लवकरच पुढील उपचारासाठी अबुधाबी येथे नेण्यात येणार असल्याची माहिती इमानची बहीण शायमा हिने दिलीय. इजिप्तमधील आणि मुंबईतील डॉक्टरांवर विश्वास नसल्याचे सांगत अबुधाबी इथल्या व्हीपीएस हेल्थकेअर रुग्णालयातील 7 डॉक्टरांनी मुंबईत येऊन इमानच्या प्रकृतीची चौकशी केली आणि इमानच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मागील दोन महिन्यात तिच्यावर सुरू असलेल्या संपूर्ण उपचारांची माहिती घेतल्याचेही इमानची बहीण शायमा हिने सांगितले. अबुधाबीच्या बुरजील रुग्णालयात तिच्यावर उपचार होऊ शकतात. बुरजील रुग्णालयाने इमान अहमदवर उपचार करण्याची तयारी दाखवली आहे. दिल्लीतील व्हीपीएस समुहातील चार डॉक्टरांचे पथक इमानच्या सर्व फाईल्स तपासणार आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी इमानला अबुधाबीच्या रुग्णालयात हलवण्यात येईल. तर, इमानचे वजन 171 किलोवर आल्याचा दावाही रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.