मुंबईत संचारबंदी लागू करण्याचे महापौरांचे संकेत

राज्यासहीत मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या रोज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरांमधील अनेक भागांत रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत संचारबंदी लागू करण्याबाबतचे संकेत दिले आहेत.

मुंबईत संचारबंदी लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसच बाजारांमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. ज्या ठिकाणी जास्त गर्दी होणारे बाजार आहेत ते दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

दादर येथील भाजी व फुल बाजार मध्यवर्ती ठिकाणी असून खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्याने त्यामुळे हे दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत. बीकेसी व सोमय्या मैदानात दोन्हीकडे भाजी व फुल विक्रेते बसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.  पुन्हा एकदा शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व मुंबईकरांनी कोरोना नियम पाळणं येणं गरजेचं आहे, असं आवाहनही पेडणेकर यांनी केलं आहे.

कोरोना रुग्ण वाढत असल्याने औरंगाबाद , नागपूर , अमरावतीसह काही शहरांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख

पुढील बातमी
इतर बातम्या