सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर्स जाणार संपावर

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर पुढील आठवड्यात संपावर जाणार आहेत. वाढीव विद्यावेतन मिळावे म्हणून इंटर्न डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला आहे. या संपात १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर सहभागी होणार आहेत. 

इंटर्न डॉक्टरांना ११ हजार रुपये पगार म्हणजेच विद्यावेतन मिळत आहे. सरकारी रुग्णालयातील २९५० डॉक्टर्स जून-जुलै २०२० पासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. या इंटर्न डॉक्टरांना कुठलाही अतिरिक्त मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे हे डॉक्टर आता वाढीव ३० हजार ते ५० हजार रुपये विद्यावेतन मिळावे, अशी मागणी करत आहे. मात्र, सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने इंटर्न डॉक्टर आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ते पुढील आठवड्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

या आंदोलनात मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर पाठिंबा म्हणून एक दिवस काम बंद करणार आहेत. त्यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयातील या डॉक्टरांना कोविडसाठी ३९ हजार रुपये अतिरिक्त, असे एकूण ५० हजार रुपये विद्यावेतन मिळत आहे.

तर, पुण्यातील सरकारी रुग्णालयातील इंटर्नना ३० हजार रुपये वेतन मिळत आहे. मात्र, इतर सरकारी रुग्णालयातील इंटर्न कोविड सेवा देत असतानाही त्यांना ११ हजार रुपयेच मिळत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.


हेही वाचा -

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकल


पुढील बातमी
इतर बातम्या