कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोज दीड हजाराच्या आसपास येथे नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण आला आहे. आगामी काळात बेडची कमतरता भासू शकते. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुले यांच्या सहकार्याने कल्याणमध्ये ११०० खाटांची क्षमता असणारं कोविड केअर रुग्णालय आठवड्याभरात सुरू करणार आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने आता कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह रुग्णांची रवानगी थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तर लग्नसमारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन ३० एप्रिल पर्यंत सील करण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे.
यानुसार, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही. हॉल तिकीट दाखवून प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो, स्विगी आदींना २४ तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी आहे. अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, फळविक्रेते, मिठाई यांची दुकाने सकाळी ७ ते रात्री८ सुरू राहतील.मटण-चिकन-अंडी-मासे विक्री दुकाने आठवडाभर नियमांचे पालन करत सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहणार आहे. भाजीपाला विक्रेते ६ फूट अंतर ठेऊन आणि वर्तुळ काढून विक्री करतील.
औषध दुकाने हॉस्पिटलला वेळेचे बंधन नाही. पीठ गिरणी आठवड्याचे सातही दिवस सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आईस्क्रीम, ज्यूस, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्याच्या कडेचे स्टॉलला फक्त पार्सल विक्रीस परवानगी. होम डिलिव्हरी करणार असेल तरच सुरू अन्यथा बंद ठेवायचे आहेत.
हेही वाचा -
कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन
दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर