ब्रिस्टॉल शहराच्या धर्तीवर मुंबईत 'मेंदू पेढी' ची मागणी

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

अपघातामुळे मेंदूस इजा अथवा मेंदूचा आजार जडल्यास अनेकदा रुग्णांचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावे यासाठी मुंबईत मानवी मेंदूची पेढी निर्माण केली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

इंग्लंडमधील ब्रिस्टॉल शहराच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालयात मानवी मेंदूची पेढी उभारण्यात यावी. जेणेकरून मेंदू आणि तत्सम आजार असलेल्या रुग्णांना तसेच अपघातग्रस्त व्यक्तीस योग्य उपचार मिळू शकतील, अशी मागणी मनसेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

मुंबईत रक्तपेढी, नेत्र पेढी, मातृदुग्ध पेढी, स्कंधकोशिका ( स्टेमलेस) पेढी, यांसारख्या पेढ्या आहेत. या पेढ्यांमधून रक्त, नेत्र पटल, इत्यादी आवश्यकतेनुसार गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते. मात्र, मानवी मेंदूचा अभाव असल्यामुळे एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मेंदूस इजा झाल्यास किंवा मेंदूसंदर्भात आजार निर्माण झाल्यास त्यांचा मेंदू मृत्यूच्या वेळेपासून 72 तासांच्या आत काढून, स्कायलिंगबोर्ड पॅकेट ट्युबमध्ये उणे 150 अंश सेल्सियस तापमानात सुरक्षित ठेवता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे मेंदूची पेढी निर्माण केल्यास या संदर्भातील रुग्णांना दिलासा मिळू शकतो, असे नरवणकर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा - 

मृत्यूनंतरही 'त्या'ने वाचवले 6 जीव!

जे.जे रुग्णालयात पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


पुढील बातमी
इतर बातम्या