100th corona testing lab: शंभराव्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचं मुंबईत लोकार्पण

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालय (जी.टी. हॉस्पिटल) इथं राज्यातील शंभराव्या कोरोना विषाणू रुग्ण चिकित्सा प्रयोगशाळेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Friday launched the 100th COVID testing laboratory in the GT hospital ) करण्यात आलं. या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

महाराष्ट्र पुढं

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, वरळीतील एनएससीआयचा डोम, गोरेगाव इथं युद्धपातळीवर कोविडसाठी ‘फिल्ड हॉस्पिटल्स’ उभारण्यात आली आहेत. कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र देशात पुढंच आहे. आपण महाराष्ट्रात उभारलेल्या फिल्ड हॉस्पिटल्सप्रमाणे दिल्लीत देखील असंच हॉस्पिटल्स उभारण्यात येत आहेत. मुंबई, ठाण्यात सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते, ही कामगिरी थक्क करणारी असून हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं आहे. आपण रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा - कोरोनावर आली गोळी, १०३ रुपयांच्या गोळीचं मुंबईत उत्पादन सुरू

सर्वाधिक केंद्र

आपण महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, त्या ठिकाणी आवश्यक तज्ज्ञ-तंत्रज्ञ नियुक्त केले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आज आपण ऑक्सिजन, डायलिसिस मशीन्स, व्हेंटिलेटर्स याची उपलब्धता करण्याबरोबरच प्लाझ्मा थेरपीसाठीही प्रयोगशील आहोत. त्यामुळे आपण कोणत्याही बाबतीत उपचारात मागे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव, पावसाचे दिवस हे सगळं लक्षात घेऊनच यापुढील काळात कोरोना चाचणी केंद्रांची संख्या अधिक वाढवावी लागणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पथदर्शक काम

मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा महाराष्ट्रात फक्त पुणे आणि कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची सुविधा होती, मात्र आज महाराष्ट्रात १०० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची तपासणी होत आहे. आज शासकीय लॅबमध्ये १७ हजार ५०० तर खाजगी लॅबमध्ये २० हजार ५०० अशा जवळपास ३८ हजार चाचण्या एका दिवसात होत आहेत. याचाच अर्थ अडीच महिन्यातच आपण ही यंत्रणा उभी केली आहे. आज महाराष्ट्रातील २० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष, आयसीयू वॉर्ड तयार करण्याबरोबरच ‘समर्पित कोविड रुग्णालये’ तयार करण्यात आली आहेत. देशात स्वस्त व सुलभ कोरोना चाचणी करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून त्यामुळेच कोरोनाच्या या आपत्तीत महाराष्ट्राने केलेल' काम पथदर्शक ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - धारावीत शनिवारी आढळले अवघे ७ नवे रुग्ण
पुढील बातमी
इतर बातम्या