जानेवारीत ओमिक्रॉन रुग्णांमध्ये होणार वाढ - आरोग्य विभाग

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं सांगितलं की, जानेवारीमध्ये राज्यात ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल. कारण नवा व्हेरिएंट केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर लहान शहरांमध्येही पसरत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं मंत्रिमंडळाला सादर केलेल्या अहवालात हे नमूद केलं आहे.

ओमिक्रॉनचा राज्यभरात झपाट्यानं प्रसार होत असल्यानं विभाग ट्रॅकिंग, ट्रेसिंग, चाचणी यावर अधिक भर देत आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं. यासोबतच लोकसंख्येचे १०० टक्के पूर्णपणे लसीकरण करण्यावर सरकार भर देत असल्याचंही त्यांनी नमूद केले.

बुधवार, १५ डिसेंबर रोजी, ओमिक्रॉनची ४ नवीन प्रकरणं समोर आली. उस्मानाबादमधील दोन आणि मुंबई आणि परभणीमध्ये प्रत्येकी एक असे ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. तथापि, यापैकी २५ जणांना आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शिवाय, कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी, मुंबई पोलिसांनी उत्सवापूर्वी कलम १४४ आणि इतर निर्बंध लागू केले.


हेही वाचा

थर्टी फर्स्ट पार्टीवर महापालिका ठेवणार करडी नजर

चिंतादायक, मुंबईत सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या