सायन रुग्णालयातील ९९ डाॅक्टारांसह १९० हून अधिक कर्मचारी कोरोनाग्रस्त

सायन येथील मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रूग्णालयातील ९२ निवासी आणि ७ शिकावू डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. शिवाय रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसंच परिचारिका असे १९० हून अधिक कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोनाबाधित झालेल्या डॉक्टरांपैकी ६० जणांची प्रकृती सुधारत असून फक्त ३० डॉक्टरांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाची लागण झालेले इतर कर्मचारी, परिचारिका यांच्यावरही उपचार सुरू असून यापैकी कुणीही गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात काम करणारे नरेश लोखंडे या ३५ वर्षांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्याचं कोरोनामुळे निधन झाल्याने कर्मचारी वर्ग चिंतेत आहे. दोन आठवड्यांपूर्वी लोखंडे यांच्या वडिलांचंही करोनामुळे निधन झालं होतं.

हेही वाचा - दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३३ दिवसांवर

सध्या वॉर्ड क्रमांक ७ हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. निवासी डाॅक्टरांमधील संसर्ग वाढू नये म्हणून लो. टिळक रुग्णालयातील वसतिगृहाव्यतिरिक्त काही निवासी डाॅक्टरांची राहण्याची व्यवस्था दादरमधील काही हाॅटेलांमध्येही करण्यात आली आहे. जेणेकरून एकाच खोलील ३ ते ४ जण राहात असताना होणारी गर्दी टाळता येईल.  

सद्यस्थितीत लोकमान्य टिकळ रुग्णालयात ३०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धारावीतून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण कमी झालं असलं, तरी माहीम, माटुंगा, सायन परिसरातील रुग्ण अजूनही मोठ्या संख्येने इथं येत आहेत. त्यातच रुग्णालयातील बहुतांश डाॅक्टर आणि इतर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने उरलेल्या यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.  

हेही वाचा - धक्कादायक! मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिक
पुढील बातमी
इतर बातम्या