मुंबईला मिळाले कोव्हिशिल्ड लसीचे आणखी सव्वा लाख डोस

मुंबईला राज्याकडून कोव्हिशिल्ड लशींचे १ लाख २५ हजार डोस मिळाले आहेत.  यामुळे मुंबईतील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. परळ येथील एफ दक्षिण विभागात ही लस ठेवण्यात आली आहे.

 राज्याकडून मुंबईला पहिल्या टप्प्यात कोव्हिशिल्ड लशीचे १ लाख ३९ डोस मिळाले होते. कोविन ॲपवर नाव नोंदणी झालेल्या एक लाख २५ हजार कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध लशींच्या साठ्यांमधून पालिकेने ६० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन केले होते. लशीचा पुढचा साठा केंद्राकडून आला आहे. यामधील १ लाख २५ हजार डोस मुंबईला मिळाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. 

मुंबईत सध्य १० लसीकरण केंद्र आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुंबईतील लसीकरण केंद्रांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.  सेव्हन हिल्स रुग्णालयातील लसीकरण केंद्र बुधवारी सुरू झाले आहे. या केंद्रामध्ये १५ कक्ष उभारले आहेत. प्रत्येक कक्षात १०० याप्रमाणे दीड हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची क्षमता या ठिकाणी आहे. सध्या रुग्णालयाला चार हजार लशींचे डोस दिले आहे. 

लसीकरण प्रक्रिया वेगाने करण्यासाठी पुढील काही दिवसांत मुंबईत आणखी तीस लसीकरण केंद्रे कार्यरत करण्यात येणार आहेत. सध्या केईएम, लो. टिळक, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह भाभा रुग्णालय (वांद्रे), शताब्दी रुग्णालय (कांदिवली) आणि व्ही. एन. देसाई (सांताक्रूझ) या तीन उपनगरीय रुग्णालयांचा समावेश आहे. आता आणखी नऊ उपनगरीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील कोरोना आरोग्य केंद्रानंतर आणखी चार मोठ्या कोरोना आरोग्य केंद्रातही लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त १४ प्रसूतिगृह आणि दवाखान्यांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू होतील. 


हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका


पुढील बातमी
इतर बातम्या