दिलासादायक! मुंबईत चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद

कोरोना प्रादुर्भावामुळं मुंबईत आतापर्यंत पाचव्यांदा आणि डिसेंबर महिन्यात चौथ्यांदा दिवसभरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. या आधी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत चौथ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनानं परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जातं आहे. तसंच २४ तासात एकही ओमिक्रॉन रुग्ण आढळला नाही. 

डिसेंबर महिन्यात याआधी ११, १५ आणि १८ डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईला हा मोठा दिलासा मिळत आहे. 

मुंबईत गेल्या २४ तासात २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,४६,३२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात एकाही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत २०५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर २०९५ दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी झाली आहे. मुंबईतील सध्या १७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.


हेही वाचा

वर्षाअखेरीस 'हे' जिल्हे १००% प्रथम डोसचे लक्ष्य पूर्ण करतील

ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये आढळतात 'ही' लक्षणं

पुढील बातमी
इतर बातम्या