मुंबईत आतापर्यंत १४ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आहे. सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील १३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचदरम्यान, ओमिक्रॉनची नेमकी लक्षणे काय आहेत, याची माहिती या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहेत.
मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रूग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आली आहेत. त्यात काही प्रमाणात घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून आली आहेत.
मुंबईत आढळलेल्या १४ रुग्णांपैकी आठ जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली, त्यात प्रामुख्यानं घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे दिसून आली, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
या व्यतिरिक्त त्यांच्यात कोणतेही आजार दिसून आलेले नाहीत. फुफ्फुसावर कोणताही परिणाम झालेला नव्हता, असे तपासणी अहवालात दिसून आले आहे. याचाच अर्थ साधारण ताप आणि अंगदुखीवर औषधोपचार करण्यात आले. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना मल्टिव्हिटॅमिन देण्यात आले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, ओमिक्रॉनच्या ५० टक्के रुग्णांमध्ये एकही लक्षण आढळून आलेले नाही. पहिल्या दिवशी रुग्णाला सौम्य ताप, सर्दी आणि खोकला ही लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.
वास न येणे हे कोविड १९चे लक्षण असले तरी, ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आले नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. महाराष्ट्रात आढळून आलेल्या ३२ रुग्णांमधील २५ रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. तर यातील ५ हे अल्पवयीन आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा