राज्यात आॅक्सिजन अभावी एकही कोविड मृत्यू नाही?, राजेश टोपेंनी केला खुलासा

राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने नुकतंच मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. यावर बरेच आरोप-प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे. 

राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्राचं उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आॅक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. मात्र देशातील अन्य राज्यात मृत्यू झाले असतील, त्या बद्दल मी भाष्य करणार नाही. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात सभागृहात बसलेले काही जण म्हणालेत की, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहेत. पण त्यांनी राज्याचं नाव घेतलेलं नाही. महाराष्ट्रात असे मृत्यू झालेले नाहीत, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं.

हेही वाचा- आॅक्सिजन टंचाईमुळे राज्यात एकही मृत्यू नाही- राजेश टोपे

सर्व राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या आदेशानुसार मृत्यूचे रिपोर्ट राज्यांनी दिले आहेत. यामध्ये कोणत्याही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं एकही मृत्यू झाल्याची नोंद आढळलेली नाही, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितलं होतं. तेव्हापासून संसदेत राजकीय गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्ष मोदी सरकारवर यावरून सातत्याने टीका करत आहेत.

पाठोपाठ कोरोना काळात मृत्यू झाले असले तरी या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे.

हेही वाचा- मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर तलाव भरले

पुढील बातमी
इतर बातम्या