हृदयरोग्यांना व्हॅलेन्टाईन गिफ्ट, स्टेण्ट झालं स्वस्त

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

रुग्णालय, डाॅक्टर आणि स्टेण्ट कंपन्यांकडून होणारी रूग्णांची आर्थिक लूट रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथाॅरिटी (एनपीपीए) ने स्टेण्टच्या किंमती नियंत्रित करत या त्रिकुटांना दणका दिला. केंद्राने स्टेण्टच्या किंमती थेट ८५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांमध्ये मिळणार स्टेण्ट काही हजारांत (२७ -२८ हजारांत) रूग्णांना उपलब्ध होऊ लागलं आहे. असं असताना आता वर्षभरानंतर 'एनपीपीए'नं स्टेण्टच्या किंमती आणखी कमी करत हृदयरोग्यांना व्हॅलेन्टाईन गिफ्ट दिलं आहे.

किंमत किती कमी?

'एनपीपीए'नं घेतलेल्या निर्णयानुसार ड्रग एल्युटींग स्टेण्ट (डीईएस) अर्थात औषध सोडणाऱ्या स्टेण्टच्या आणि बायोरिसाॅर्बेबिल स्काफोल्ड (बीवीएस) स्टेण्टच्या किंमती कमी झाल्या आहेत. डीईएस आणि बीवीएस स्टेण्ट याआधी जिथं ३०,०१८ रुपयांमध्ये रूग्णांसाठी उपलब्ध व्हायचं तिथं आता हे दोन्ही स्टेण्ट केवळ २७,८९० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचं म्हणज अँजिओप्लास्टीसाठी डीईएस स्टेण्टचा वापर सर्वाधिक होतो. अशावेळी या डीईएस स्टेण्टच्या किंमती कमी झाल्यानं हृदयरोग्यांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे.

१० ऐवजी ३ टक्के वाढ

एकीकडे डीईएस आणि बीवीएस स्टेण्टच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे कोरोनरी स्टेण्टच्या किंमतीत मात्र ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७,४०० रुपयांमध्ये उपलब्ध होणारं कोरोनरी स्टेण्ट आता ७,६६० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ही वाढ झाली असली तरी ही वाढ खूपच कमी असून हा हृदयरोग्यांसाठी दिलासा मानला जात आहे.

कारण नियमानुसार वर्षभरानं स्टेण्टच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होणं अपेक्षित होतं. पण एनपीपीएनं १० टक्क्यांएेवजी केवळ ३ टक्केच वाढ करत रूग्णांना दिलासा दिल्याचं म्हणत 'एनपीपीए'च्या या निर्णयाचं जनआरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे.

कंपन्यांचे धाबे दणाणले

स्टेण्टच्या किंमती कमी केल्यानं स्टेण्ट कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून स्टेण्टवर असलेल्या कोटींगनुसार त्यांची विभागणी करत मग त्यांच्या किंमती ठरवाव्यात, अशी मागणी स्टेण्ट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून केली जात होती. 'एनपीपीए'नं मात्र ही मागणी स्पष्टपणे नाकारत स्टेण्टच्या किंमती कमी केल्या आहेत.

उपकरणांचं बिल वेगळं करा

स्टेण्टच्या किमती केल्यानंतरही रूग्णांना कसं लुटता येईल याच्या नामी शकला रूग्णालय आणि डाॅक्टरांकडून लढवल्या जातात. त्यामुळेच अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेचं बिल तयार करताना स्टेण्ट, कॅथेटर, बलून आणि इतर उपकरणाचं बिल एकत्रित करत, बिलाची रक्कम वाढवली जात होती. ही बाब एनपीपीएच्या लक्षात आल्यानं एनपीपीएनं रूग्णालय आणि डाॅक्टरांनाही दणका दिला आहे.

अँजिओप्लास्टीचं बिल अर्थात स्टेण्टचं बिल वेगळ आणि कॅथेटर, बलून तसंच इतर उपकरणाचं बिल वेगळं करणं आता एनपीपीएनं रूग्णालयांना बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आता स्टेण्टच्या किंमती योग्य लावल्या जाताहेत की नाही हे समजणं सोपं होणार आहे.


हेही वाचा-

महाग स्टेण्टप्रकरणी एनपीपीएकडे रूग्णालयांबद्दल तक्रारी

यापुढे देशात अॅबॉटचे डिझॉल्व्हिंग स्टेण्ट मिळणार नाहीत!


पुढील बातमी
इतर बातम्या