Advertisement

महाग स्टेण्टप्रकरणी एनपीपीएकडे रूग्णालयांबद्दल तक्रारी


महाग स्टेण्टप्रकरणी एनपीपीएकडे रूग्णालयांबद्दल तक्रारी
SHARES

मुंबई - स्टेण्टच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. पण तरीही मुंबईसह देशभरातील रुग्णालयांकडून चढ्या किंमतीत स्टेण्टची विक्री करून रुग्णांची लूट सुरू आहे. नॅशनल प्रायझिंग फार्मास्युटिकल अॅथॉरिटी (एनपीपीए)कडे आलेल्या तक्रारीतून ही बाब समोर आली आहे. 14 फेब्रुवारीपासून 6 मार्चपर्यंत एनपीपीएकडे 30 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात मुंबईसह महाराष्ट्रातील सहा रूग्णालयांचा समावेश आहे. तक्रार दाखल झालेल्या 30 रुग्णालयांपैकी 11 रूग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून चौकशी सुरू आहे. तर उर्वरित रुग्णालयांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार आहेत.

स्टेण्ट वाढीव किंमतींना विकले जात असेल किंवा स्टेण्टच्या नावे बिल अधिकचे लावले जात असेल तर असे रूग्ण एनपीपीएच्या 1800111255 या हेल्पलाईनवर संपर्क साधत आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यानुसार आतापर्यंत 30 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात मुंबईतील केईएम, किंग एडवर्ड हाॅस्पिटल, लीलावती या रुग्णालयांचा तर मिरारोडमधील भक्ती वेदान्त या रुग्णालयाचा समावेश आहे. त्याशिवाय नाशिकमधील सिक्स सिगमा मेडीकेअर अँड रिसर्च आणि पुण्यातील पुणे हाँस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर रुग्णालयाचाही समावेश आहे.

याविषयी अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त ओमप्रकाश साधवाणी यांच्याशी संपर्क साधला. तर त्यांनी एनपीपीएकडे राज्यातील सहा रुग्णालयांविरोधात तक्रारी दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयांची चौकशी सुरू आहे. पण तक्रारदारांनी बिल आणि इतर कागदपत्रे एनपीपीएकडे सादर केलेली नाहीत. त्यामुळे चौकशीत अडचण निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर केईएम आणि लीलावती रुग्णालयांची चौकशी झाली असून तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असेल तरी ही रूग्णालये आता एनपीपीएच्या रडारवर असून चौकशीत ही रुग्णालये दोषी आढळल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा