३०० किलोवरून ती आली ८६ किलोवर, आशियातील सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या ३०० किलोच्या एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून या शस्त्रक्रियेनंतर संबंधित महिलेचं वजन थेट ८६ किलोंवर आणण्यात डाॅक्टरांना यश आलं आहे. पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या अमिता राजानी (४२) असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात बेरियाट्रीक सर्जरी करण्यात आली आहे.  

वजनात वाढ

वयाच्या सहाव्या वर्षापासून अमिता यांचं वय वाढायला सुरूवात झाली. १६ व्या वर्षी त्यांचं वजन १२६ किलो झालं. तर पुढे ते ३०० किलोंवर जाऊन पोहोचलं यामुळे त्यांना शारीरिक हालचाल करणंही कठीण झालं. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी देशातील तसंच परदेशातील अनेक तज्ज्ञ एंडोक्रिनोलॉस्टस्ना दाखवलं. परंतु कुणालाही त्यांच्या स्थूलपणावर उपचार करता येत नव्हते.   

२ टप्प्यात शस्त्रक्रिया 

अखेर ४ वर्षांपूर्वी  लिलावती रिसर्च सेंटर आणि हिंदुजा रुग्णालयातील  बेरिऑट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी अमिता यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया २ टप्प्यांमध्ये करण्यात आली. पहिल्या टप्प्यात २०१५ मध्ये त्यांच्यावर लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय संदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. त्यांचं वजन बरंचसं कमी झाल्याने त्या स्वत:हून चालू लागल्या. त्यानंतर २०१७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यावर  गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी त्यांचं वजन १४० किलो होतं. त्यानंतर डाॅक्टरांनी ठरवून दिलेला आहार आणि व्यायामाच्या जोरावर त्यांचं वजन  ८६ किलोंवर आलं.

या शस्त्रक्रियेनंतर ८ वर्षे अंथरूणाला खिळून असलेल्या अमिता यांना खऱ्या अर्थाने जीवनदान मिळालं आहे. आता त्या कुणाच्याही साहाय्याशिवाय स्वत:ची कामे स्वत: करण्यास सक्षम झाल्या आहेत.


हेही वाचा-

पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदी

भारतीय पितात वर्षाला ५.९ लिटर दारू


पुढील बातमी
इतर बातम्या