'मायलॅब' नावाच्या एका भारतीय कंपनीनं सर्वात वेगवान कोरोनाव्हायरस टेस्टिंग किट बाजारात आणल्या आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या रूपात आलेल्या संकटाला देश सामोरा जात आहे. मायलॅबच्या एका अधिका्यानं ट्विटरवर यासंदर्भात याची घोषणा केली.
ट्विटरद्वारे त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, मायलॅब ही वेगवान कोरोना टेस्टिंग किट बाजारात आणणारी भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी ठरली आहे. प्रविण परदेशी यांचे आभार. रेकॉर्डब्रेकिंग वेळेत किट्सचे मूल्यांकन केल्याबद्दल कस्तुरबा रुग्णालय आणि डॉ. शास्त्री यांचे विशेष आभार.
पुणेस्थित कंपनी ही मैलाचा दगड गाठणारी भारतातील पहिली कंपनी बनली आहे. अहवालानुसार, चाचणीस सध्या जवळजवळ काही तास लागतात आणि मायलॅबनं केलेल्या प्रक्रियेस केवळ २.५ तास लागतात. मायलॅबचे वैद्यकीय संचालक डॉ. गौतम वानखडे यांनी इकॉनॉमिक टाइम्सकडे याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, या किट्सचा वापर करून एक मोठ्या लॅब सुमारे १००० नमुने घेऊ शकतात. तर छोट्या लॅबमधून सुमारे २०० नमुने घेता येऊ शकतील. या किटची किंमत सुमारे १२०० रुपये असेल.
या किटला नॅशनल इन्स्टिट्य़ूट ऑफ व्हायरोलॉजीनं प्रमाणित केलं गेलं आहे. यासह मायलॅब देखील अधिकृतता मिळविणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. टीमनं या कोविड -१९ डायग्नोस्टिक टेस्ट किटला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेज चेन रिएक्शन (आरटी-पीसीआर) चाचणी म्हटलं आहे. याची तपासणी भारतीय औषध नियंत्रकांनी केली आहे.
पालिकेच्या अधिकृत हँडलनं यासंदर्भातील बातमी एका मेसेजसोबत शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, "कोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढाईत या यश मिळाल्याबद्दल पुणे मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचं अभिनंदन"
आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रयत्नांचं कौतुक केलृं आणि म्हणाले, "मला आठवतंय की आम्ही पहिल्यांदा ही चाचणी होत असल्याचं ऐकलं तेव्हा यातून मार्ग सापडेल अशी आशा व्यक्त केली होती."
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले की, स्थानिक आणि केंद्र सरकारच्या मदतीने मेक इन इंडियांतर्गत कोव्हिड-19 ची तपासणी करणारे किट तयार केले आहे. याला जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोलच्या दिशानिर्देशद्वारे बनविण्यात आलेले आहे.
मायलॅब सध्या ब्लड बँक, हॉस्टिपलसाठी एचआयव्ही तपासणी किट बनवते. या किटद्वारे तपासणीचे परिणाम एकदम अचूक येतील, असा दावा कंपनीने केला आहे. सध्या सरकारनं जर्मनीवरून लाखो तपासणी किट आयात केले आहेत. मायलॅबने दावा केला आहे की, येणाऱ्या काळात कोरोना तपासणीसाठी एका आठवड्यात एक लाख किट बनवले जातील.
हेही वाचा