'राजावाडी'त सुरू होणार मातृदुग्ध पेढी

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

राजावाडी रुग्णालयात लवकरच 'मातृदुग्ध पेढी' सुरू होणार आहे. आईचं दूध नवजात बालकाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. पण अनेकदा प्रसूतीनंतर काही मातांना आपल्या बालकाला दूध पाजता येत नाही किंवा काही मातांना पुरेसं दुधच येत नाही. अशा स्थितीत बाळांना वेळेत दूध मिळावं या उद्देशानं घाटकोपर मधील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात लवकरच मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात येणार आहे.

शीवमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात आशियातील पहिली मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली होती. या रुग्णालयातल्या 'एनआयसीयू' विभागातील मुलांना मातृदुग्ध पेढीद्वारे मिळणारे दूध संजीवनी ठरत आहे. याच धर्तीवर राजावाडी रुग्णालयातही मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ही पेढी सुरू केली जाईल, असं राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितलं.

घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, ठाणे, मुलुंड, कल्याण, बदलापूर आणि नवी मुंबई इ. भागातील महिला राजावाडी रुग्णालयात प्रसूतीसाठी नावनोंदणी करतात. बऱ्याचदा इतर रुग्णालयातूनही महिलांना राजावाडी रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठवले जाते. राजावाडीत दरवर्षी साधारणतः ४,५०० सर्वसाधारण प्रसूती, तर ३० हून अधिक सिझेरियन होतात. प्रसूतीनंतर काही बाळांचं वजन कमी असल्यास किंवा अन्य काही त्रास बाळाला होत असल्यास त्याला 'एनआयसीयू' विभागात ठेवलं जातं. 'एनआयसीयू' विभागातील खाटांची संख्याही १० वरून २० करण्यात आली आहे.

सध्या काय स्थिती?

दरवर्षी साधारणतः २ ते ३ हजार बालकांना या रुग्णालयात दाखल केले जाते. ज्या बाळांची आई दूध देण्यायोग्य असते. अशा बाळांना आईचे दूध मिळते. आई नसलेल्या किंवा आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्या बाळांना दूध मिळू शकत नाही, अशा बाळांसाठी गायीचे दूध किंवा दुधाची पावडर वापरली जाते. हे दूध चांगले उकळवले जाते. त्यानंतरच थंड करून बाळांना दूध पाजले जाते. या बाळांना दिवसभरात अंदाजे तीन-चार वेळा दुधाची आवश्यकता भासते. त्यामुळे दिवसाला प्रत्येकी ३-४ लीटर दुधाची गरज लागते.

या माताही पाजतात बाळाला दूध

मृत बाळाला जन्म दिलेल्या किंवा बाळ दगावलेल्या माता बाहृयरुग्ण विभागात तपासण्यासाठी आल्यानंतर त्यांना दूध देण्यासाठी विनंती केली जाते. आजही ही पद्धत सुरू आहे. अनेकदा काही माता दूध द्यायला तयार होत नाही. त्यामुळे मातृदुग्ध पेढी सुरू करण्याचा विचार अनेक वर्षांपासून सुरू होता. त्यानुसार आता मातादुग्ध पेढी सुरू करण्यात येणार असल्याचंही डॉ. ठाकूर यांनी सांगितलं.

या मातृदूग्ध पेढी विषयीचा प्रस्ताव आमच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे. प्राथमिक तत्वावर ही मातृदूग्ध पेढी असेल. या पेढीच्या मदतीनं ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही, ते मिळेल.

डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रुग्णालय


हे देखील वाचा -

अवघ्या दोन मिनिटांत होईल, दूध का दूध अन् पानी का पानी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या