Advertisement

पालिका रुग्णालयात लवकरच स्तनपानासाठी ‘हिरकणी कक्ष’?


पालिका रुग्णालयात लवकरच स्तनपानासाठी ‘हिरकणी कक्ष’?
SHARES

महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हिरकणी कक्ष उभारणार असल्याची घोषणा केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी केली आहे. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात स्तनपान करण्याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बरेच कार्यक्रम राबवले जातात. बाळाने जन्म घेतल्यानंतर पुढील 6 महिन्यांपर्यंत आईचं दूध बाळाच्या आरोग्यासाठी आणि आईसाठी महत्त्वाचं असतं. पण, याविषयी मातांमध्येही तितकीशी नसलेली जागृती आणि जागेअभावी त्या या गोष्टीकडे गांभीर्याने पहात नाहीत. याच पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयांमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्तनपानाविषयी समाजात अधिक जागरुकता निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे जागा उपलब्ध असेल तिथे आम्ही प्राथमिक तत्त्वावर हिरकणी कक्ष उभारण्याचा प्रयत्न करु. तसंच याविषयी सर्व रुग्णालयांच्या अधिष्ठातांची बैठकही घेणार आहोत. 

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम

सार्वजनिक ठिकाणी महिलांना बाळाला दूध पाजताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे, राज्यात 'हिरकणी कक्ष' ही योजना राबवण्यात आली. पण, अजूनही या योजनेचा अभाव मुंबईसारख्या मोठ्या शहरात असल्याचं आढळून येत आहे. कारण, आपल्याकडे बाळांतीण मातांसाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही. यावर तोडगा म्हणून पालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा आहे, तिथे स्तनपानासाठी 'हिरकणी कक्ष' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्याकडे गेल्या 11 महिन्यांपासून मातांसाठी एक हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. महिला कामावर जातात. त्यामुळे पाळणाघर हा पर्याय अशावेळी त्यांच्यासमोर असतो. आणि मग बाळांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. बाळाच्या जन्मानंतर 6 महिने फक्त आईचं दूध हाच आहार बाळासाठी महत्त्वाचा असतो.

डॉ. अनिल चोपडे, अधिष्ठाता, माता व बाल कल्याण रुग्णालय

केईएम हे मुंबईतील महापालिकेचं सर्वात मोठं रुग्णालय आहे. जिथे बऱ्याच ठिकाणाहून रुग्ण येतात. त्यामुळे, स्तनपान करणाऱ्या मातांसाठी केईएम रुग्णालय प्रशासन एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे. स्तनपानासाठी मातांना एक शांत आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी केईएम रुग्णालयात हिरकणी कक्षांची निर्मिती केली जाणार आहे. केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ही घोषणा केली. मुंबई ब्रेस्टफीडिंग प्रमोशन कमिटीने (एमबीपीसी) 'जागतिक स्तनपान सप्ताहा'निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्तनपानासाठी जागाच नाही, या गोष्टीवरुन अनेकदा वाद झाले आहेत. मध्यंतरी माजी नगरसेविका भारती बावदाणे यांनी देखील यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. तसंच, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनीही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून रेल्वे स्टेशनवर स्तनपान कक्ष उभारण्याची मागणी केली होती. लांबच्या प्रवासामध्ये महिला प्रवाशांना स्तनपान देण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

खरंतर स्तनपानाबाबत महिलांमध्ये तितकीशी जागृती नाही. ही सर्व नैसर्गिक पद्धत आहे. यासाठी महिलांनी लाजण्याची गरज नाही. महिलांनी आपल्या बाळाला स्तनपान हे दिलंच पाहिजे. त्यासाठी महिलांसह पुरुषांचीही मानसिकता बदलली पाहिजे. त्यासाठी सरकारने परदेशासारखं प्रत्येक शौचालयासोबत एक स्तनपान कक्षही तयार केला पाहिजे.  

डॉ. नंदिता फाळशेतकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

महाराष्ट्रात राज्य शासनाच्या बस थांब्यांवर स्तनपान करणं सुलभ व्हावं, यासाठी याआधीच 'हिरकणी कक्ष' उभारण्यात आले आहेत. पहिला हिरकणी कक्ष हा पंढरपूर येथे सुरू करण्यात आला.



हेही वाचा

मुंबईत 20 टक्के बालकं कुपोषित


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा