आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिर

रेमडिसेव्हिर इंजेक्शन खाजगी रुग्णालयांतील रुग्णांना अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागानं घेतला आहे. यासाठी प्रत्ये क जिल्ह्यात किमान एका औषधाचं दुकान उभारण्यात येणार आहे. त्यानुसार ५९ दुकानं निश्चित करण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये २ हजार ३६० रुपयांमध्ये रेमडिसेव्हिरचे एक इंजेक्शन उपलब्ध असेल.

रेमडिसेव्हिर हे औषध मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना दिली जातात. सध्या या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शिवाय या इंजेक्शनची किंमत जास्त असल्यानं सर्वच रुग्णांना आर्थिकदृष्ट्या हे परवडणारं नाही.

राज्यातील हीच परिस्थिती पाहता इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचं यावर नियंत्रण राहणार आहे. या योजने अंतर्गत दररोज ५ हजार इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून देण्यात येणार आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जिल्ह्याच्या गरजेनुसार आरोग्य विभागाकडून मागणी केल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडे रुग्णांच्या माहितीसह खाजगी रुग्णालयांना इंजेक्शनची मागणी करावी लागेल. त्यानंतरच संबंधित दुकानांमध्ये औषध मिळेल. 


हेही वाचा

नवी मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवर

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १४० नवीन कोरोना रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या