महापालिकेच्या ३४ शाळा विलगीकरणातून मुक्त

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू कमी होत आहे. अशातच कोरोना रुग्णांवरील उपचार व विलगीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिकेच्या शाळाही मुक्त झाल्या आहेत. कोरोना काळजी केंद्र, आरोग्य केंद्र, जम्बो केंद्र म्हणून वापरण्यात येणाऱ्या ३४ शाळा पुन्हा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडं सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

सध्यस्थितीत महापालिकेच्या ३८ शाळा रुग्ण विलगीकरणासाठी वापरण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ठिकठिकाणच्या ७२ शाळा विलगीकरणासाठी उपलब्ध करण्यात आल्या. या शाळांमध्ये तातडीने खाटांची आणि आवश्यक त्या बाबींची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची तेथे रवानगी करण्यास सुरुवात झाली.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक ठिकाणी कोरोना काळजी केंद्र, कोरोना आरोग्य केंद्र आणि कोरोना जम्बो सुविधा केंद्रे उभारण्यात आली. जम्बो सुविधा केंद्र उपलब्ध झाल्यामुळं प्रशासनानं एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत २ कोरोना केंद्रे सुरू ठेवून उर्वरित केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.

माहीम येथील निसर्ग उद्यानासमोर मोठं कोरोना आरोग्य केंद्र उभारण्यात आल्यानंतर धारावी म्युनिसिपल शाळेतील कोरोना काळजी केंद्र बंद करण्यात आले. मुंबईतील अन्य ठिकाणच्या महापालिका शाळांमधील कोरोना विषयक केंद्रे बंद करण्यात आली. एकूण ७२ पैकी ३४ शाळांमधील कोरोना काळजी केंद्रे बंद करण्यात आली असून, या शाळा शिक्षण विभागाला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. कोरोना काळजी केंद्र बंद केल्यानंतर या शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आलो.

महापालिकेच्या ३८ शाळांचा वापर विलगीकरणासाठी होत आहे. या शाळांमध्ये नियमितपणं साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. राज्य सरकारनं शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर तात्काळ त्या सुरू करण्यात येतील. महापालिकेच्या सर्व शाळांची नियमितपणे देखभाल आणि साफसफाई करण्यात येत आहे.


हेही वाचा -

ओशिवरा पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव, पालिका १८ महिने पूल करणार बंद

मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


पुढील बातमी
इतर बातम्या