भावाने बहिणीला दिलं जीवदान, ओवाळणी म्हणून दिलं मूत्रपिंड

अवयवदानासाठी सतत होणाऱ्या जनजागृतीमुळे सध्या अवयवदान करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. आपल्या एका अवयवामुळे जर प्रिय व्यक्तीचे प्राण वाचणार असतील तर अवयवदान केले पाहिजे, याच भावनेतूनच राहुलने आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून मूत्रपिंड दान केलं. राहुलनं केलेल्या मूत्रपिंडाच्या दानामुळे त्याची बहीण रमा हिला आयुष्यभरासाठी नवसंजीवनी मिळाली आहे.

30 वर्षांची रमा गेल्या अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. लवकरातलवकर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. पण, मूत्रपिंडाची प्रतीक्षा यादी खूप मोठी होती. त्यामुळे बहिणीसाठी मूत्रपिंड कसं मिळणार या टेन्शनमध्ये असलेल्या भावानेच बहिणीसाठी मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला.

36 वर्षांच्या राहुलने त्याची बहीण रमाला ओवाळणी म्हणून नवीन आयुष्यच दिले आहे. परळच्या ग्लोबल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

रमाची प्रकृती सगळ्यात जास्त महत्त्वाची होती. प्रतीक्षायादी खूप मोठी असल्याने, मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. तो आमच्यासाठी फार भावनिक क्षण होता. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, हे पाहून खूप समाधान वाटतं.

- राहुल, रमाचा भाऊ

अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

रमावरची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. राहुल आणि रमाचे रक्तगट वेगळे असल्याने शस्त्रक्रियेमध्ये प्रचंड जोखीम होती. एखाद्या पुरुषाने स्त्रीसाठी अवयवदान करण्याचं प्रमाण खूप कमी आहे.

एखाद्या पुरुषाने अवयवदान करणं खूपच दुर्मीळ आहे. त्यामुळे राहूलची किडनीदान करण्याची इच्छा ऐकून आम्हालाही भरून आलं. आता त्या दोघांची प्रकृती उत्तम आहे.

- डॉ. भारत शहा, किडनीरोगतज्ज्ञ, ग्लोबल रुग्णालय

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आधीही एका बहिणीनं मरणाच्या दारात असलेल्या आपल्या भावाला किडनी दान केलं होतं. त्यामुळे तिच्या भावाचे प्राण वाचले होते. दोन वर्षाआधी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.


हेही वाचा - 

जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान

वडिलांची इच्छा जपली - मुलीने दुखातही घेतला अवयवदानाचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या