रेमडेसिविरचा गैरवापर रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेचं विशेष भरारी पथक

सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा जाणवत असून काही रूग्णालयांकडून इंजेक्शनचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी नवी मुंबई महापालिकेकडे आल्या आहेत. रेमडेसिविरची मागणी, वितरण व वापराबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच रेमडेसिविर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा केला जात आहे.

 रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयाम्रार्फत उपलब्ध करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असून ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांसाठी त्याचा वापर केला जावा यादृष्टीने महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असं महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष आदेशाव्दारे सूचित केलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन मागणीची औषधचिठ्ठी  रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये असाही आदेश दिला आहे.

 मात्र काही रूग्णालयांकडून रेम़डेसिविरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने आयुक्तांनी रेमडेसिविरचा गैरवापर रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विशेष भरारी पथकाची स्थापना केलेली आहे.   

हे भरारी पथक प्राप्त तक्रारीनुसार अथवा स्वयं नियोजनानुसार रूग्णालयांस भेट देऊन रूग्णालयास पुरवठा करण्यात आलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा व वापर यांचा ताळमेळ बसतोय काय याची तपासणी करेल. यामध्ये रेमडेसिविर मागणी केलेल्या रूग्णाकरिताच वापरण्यात आलेले असल्याची खात्री करण्यात येईल. तसंच  ते ज्या रूग्णाकरिता वापरलेले आहे त्याचे नाव रिकाम्या बाटलीवर लिहिले आहे का याचीही तपासणी करण्यात येईल. 

सदर रूग्णालयांनी वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या कुप्या जतन करून ठेवावयाच्या असून त्याचीही पडताळणी करण्यात येईल. याशिवाय त्या रूग्णालयाकरिता देण्यात आलेला रेमडेसिविरचा साठा हा त्या रूग्णालयातील रूग्णांकरिताच वापरलेले आहे याचीही पडताळणी भरारी पथक करेल.

  


हेही वाचा -

  1. मुंबईतील बेघरांचंही लसीकरण करणार- महापौर
  1. आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या