मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये फिरणार सायकल रुग्णवाहिका

मुंबईतल्या चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांना जाता येत नाही. त्यामुळेच की काय रुग्णांना वेळेत आणि जागेवर उपचार मिळावे या अनुशंगानं सायकल रुग्णवाहिका हा उपक्रम राज्याच्या आरोग्य विभागानं प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. एकूण वीस ‘सायकल रुग्णवाहिका' तात्काळ सुरू करण्यात येणार असून झोपडपट्टी आणि वर्दळीच्या ठिकाणी त्यांचा वावर प्रामुख्यानं राहणार आहे. 

म्हणून सायकल रुग्णवाहिकेचा गरज

मुंबईचे रस्ते सध्या मोनो आणि मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईचा वेगही मंदावला आहे. त्यातच वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे ट्राफिकची समस्या हा मोठा मुद्दा झाला आहे. या सर्व कारणांमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहचत नाहीच. त्यात मुंबईतल्या चिंचोळ्या गल्ल्यांमुळे देखील रुग्णवाहिकांना योग्य ती आरोग्यसेवा पुरवता येत नाही. यासाठी ‘सायकल रुग्णवाहिका' ही संकल्पना राबविण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे.  झोपडपट्टी परिसराबरोबरच दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही ‘सायकल रुग्णवाहिके’ची व्यवस्था असणार आहे.

कशी उपलब्ध होणार सायकल रुग्णवाहिका

साधारणपणे दीड ते दोन किलोमीटर या सायकल रुग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र राहणार आहे. १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर त्याच्या माध्यमातून ही सायकल रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. या रुग्णवाहिकेवर असलेल्या पॅरामेडिकोकडील मोबाइलशी १०८ क्रमांकाची सेवा जोडलेली असणार आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेवर वयोवृद्ध रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे  आणि उपकरणं ठेवली जातील. मात्र गंभीर स्वरूपाचे रुग्ण असल्यास त्यांच्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. 

सायकल रुग्णवाहिकेवर काय उपचार होऊ शकतात

या रुग्णवाहिकेवर रक्तदाब मोजणारे उपकरण, साखर निश्चित करण्यासाठी ग्लुकोमीटर, पल्सऑस्किमीटर, आयव्ही सेटसह आवश्यक उपकरणे असणार आहेत.  या एका सायकल रुग्णवाहिकेचा खर्च साधारणपणे २१ हजार रुपये आहे. यात सायकलची किंमत ५ हजार १०० रुपये, जीपीएस डिव्हाइसची किंमत आठ हजार रुपये, सॉफ्टवेअर तीन हजार रुपये तर वैद्यकीय उपकरणांची किंमत पाच हजार रुपये असेल.

वीस सायकल रुग्णवाहिकांचा खर्च २८ लाख ८० हजार एवढा येणार असून रुग्णाच्या घरी जाऊन सर्वप्रथम पॅरामेडिको आजाराच्या तीव्रतेनुसार उपचार करेल. दीड ते दोन किलोमीटर परिसर हे रुग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र असल्यामुळे १०८ क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ रुग्णाच्या घरी पोहोचणे शक्य होणार आहे.


हेही वाचा

जीएसबी मंडळ उभारणार सुसज्ज रुग्णालय

लवकरच सार्वजनिक शौचालयांमध्येही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन


पुढील बातमी
इतर बातम्या