धर्मादाय रुग्णालयांची फसवेगिरी उघड, गरीब रुग्णांच्या खाटांवर कमाई

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • आरोग्य

रूग्णांना योग्य सेवा न देणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे नुकतीच तपासणी करण्यात आली. यांत दोषी आढळलेल्या जसलोक रुग्णालयावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे, तर हिंदुजा रुग्णालयाला सक्त ताकीद देण्यात आली आहे. शिवाय कंबाला हिल आणि भाटिया रुग्णालय यांना शासनाकडून देण्यात येणार्‍या सुविधा काढून घेण्याचा इशारा दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावर यांनी विधान परिषदेत सांगितलं.

शासनाकडून आर्थिक लाभ घेऊनही काही धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांना योग्य सेवा देत नसल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव आणि अन्य आमदारांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना येरावर यांनी ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल आणि कंबाला हिल हॉस्पिटल या प्रसिद्ध रुग्णालयांचा समावेश आहे. सार्वजनिक न्यास संचलित या धर्मादाय रुग्णालयांनी एकूण कार्यान्वित खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्ण आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकांसाठी सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणं अपेक्षित आहे; मात्र समितीने वरील रुग्णालयांची तपासणी केली असता त्यांमध्ये अशा प्रकारच्या खाटा राखीव न ठेवता त्या खाटांवर अन्य रुग्ण असल्याचा धक्कादायक प्रकार आढळला आहे.

कशी फसवणूक?

गरीबांसाठी आरक्षित खाटांवर अन्य रुग्णांना दाखल करून ही रुग्णालये सरकारची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवत असल्याचं यांत आढळून आलं.

काय म्हणाले राज्यमंत्री?

धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर धर्मादाय रुग्णालयांतील उपलब्ध राखीव खाटा, रुग्णालयातील संपर्क व्यक्तीचं नाव, माहिती तसंच रुग्णाची आर्थिक स्थिती याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. जुलै २०१७ च्या स्थितीनुसार राज्यातील ७५ टक्के रुग्णालयांतील खाटांची उपलब्धता या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार १ मे २०१६ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरातील धर्मादाय रुग्णालयांत एकूण ४२ धर्मादाय आरोग्यसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा-

दुर्दैवी! हजार मुलांमागे फक्त ९०४ मुली

शासकीय रुग्णालयात आता कर्करोग पूर्वतपासणी केंद्र


पुढील बातमी
इतर बातम्या