Advertisement

शासकीय रुग्णालयात आता कर्करोग पूर्वतपासणी केंद्र


शासकीय रुग्णालयात आता कर्करोग पूर्वतपासणी केंद्र
SHARES

राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात टप्प्या-टप्प्याने कर्करोग पूर्वतपासणी केंद्र (प्री- कॅन्सर डिटेक्शन सेंटर) सुरू करण्यात येणार असून केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचंही प्रस्तावित आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.


किती रुग्णांवर उपचार?

कर्करोगाच्या संदर्भात आ. उल्हास पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने'तून शासकीय आणि खासगी अशा एकूण २२९ रुग्णालयात वेगवेगळ्या कर्करोगांवर उपचार केले जातात. त्यामध्ये ६८ हजार ३०० रुग्णांना केमोथेरपीचे उपचार देण्यात आले आहेत. रेडिओथेरपीच्या माध्यमातून ५९ हजार ८३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर ३८ हजार ३८४ इतक्या रुग्णांवर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत.

सदस्य उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यात कर्करोग रुग्णांची संख्या मोठी संख्या असल्याचे सांगितले, त्यावर माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांची नोंद घेण्यासाठी येत्या दोन महिन्यात टाटा कॅन्सर इन्सिट्यूटमार्फत कर्करोग नोंदणी केंद्र (कॅन्सर रजिस्ट्री सेंटर) सुरू करण्यात येईल.



केमोथेरेपीचे टप्पे

डॉ. सावंत पुढे म्हणाले की, मालवणी इथं नुकतंच प्री कॅन्सर डिटेक्शन सेंटर सुरु करण्यात आलं असून येत्या महिन्यात तिथं केमोथेरपी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात प्री- कॅन्सर डिटेक्शन सेंटर आणि केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कॅन्सर रुग्णांना सध्या केमोथेरपीच्या २ टप्प्यांचा (Cycle)लाभ देण्यात येत असून यापुढे हा लाभ उपचारासाठी ४ टप्प्यांचा करता येईल का? यावर विचार करण्यात येईल. तसंच टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली ‘कॅन्सर वॉरिअर’ ही संकल्पनाही अधिक प्रमाणात राबविण्यात येईल.


स्तनाचा वाढता कर्कराेग

अमेरिकेच्या एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. त्यामुळे राज्य शासन कर्करोगाची लोकसंख्या आधारित स्क्रीनींग करणार आहे.

राज्य शासनाकडून कर्करोग रुग्णांवर टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट सोबतच नागपूर येथील संत तुकडोजी महाराज हॉस्पिटल आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या मोठ्या संस्थेत उपचार केले जात आहेत. विभागीय स्तरावर नागपूर, औरंगाबाद तसेच अमरावती इथं कॅन्सरवर उपचार करण्याची शासनाची स्वत: ची सुविधा उपलब्ध आहे.


सदनिकांची सोय

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांना उपचार सुरू असताना राहण्यासाठी गोवंडी इथं २ इमारती बांधण्याचं प्रस्तावित असून त्यामध्ये ३०० सदनिकांची सोय करण्यात येईल. याठिकाणी जीवनावश्यक सेवांसह आपत्काल‍िन परिस्थितीत उपचारासाठी डॉक्टरही उपलब्ध असेल, असंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

त्याला होता चौथ्या स्टेजचा कॅन्सर..तरी तो वाचला!

टाटा रुग्णालयाकडून महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना कॅन्सरचं प्रशिक्षण

जागतिक कर्करोग दिन विशेष - ..तरच कॅन्सरशी लढा शक्य आहे!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा