Advertisement

टाटा रुग्णालयाकडून महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना कॅन्सरचं प्रशिक्षण


टाटा रुग्णालयाकडून महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना कॅन्सरचं प्रशिक्षण
SHARES

कॅन्सरची लक्षणे योग्य वेळीच समजली किंवा पहिल्या टप्प्यातच कॅन्सरग्रस्त रुग्णावर उपचार सुरू झाले को तो बरा होऊ शकतो. पण, अनेकदा रुग्ण कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतो. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना वाचवणं अनेकदा डॉक्टरांना कठीण होतं.

मुंबईसारख्या धावत्या शहरात सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. तेच प्रमाण ग्रामीण भागात तुलनेने थोडं कमी आहे. पण, आता ते पूर्णपणे कमी व्हावं यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाने जनजागृती करत महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना कॅन्सरचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागात कॅन्सरला प्रतिबंध घालता येईल.

ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये कॅन्सरचं निदान लवकर होत नाही. याचं कारण म्हणजे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांना कॅन्सरला प्रतिबंध कसा करावा याची योग्य आणि पुरेशी माहीती नसते. याच पार्श्वभूमीवर, टाटा मेमोरिअल रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह अॅन्कोलॉजी विभागाद्वारे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कॅन्सरला कशा पद्धतीने प्रतिबंध घालता येईल आणि तो कसा ओळखता येईल यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे. या कर्मचाऱ्यांना २४ मार्चपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर, जुलै महिन्यात डॉक्टरांनाही याबाबतच प्रशिक्षण दिलं जाणार आहे.


प्रशिक्षणात ५ जिल्ह्यांचा समावेश

या प्रशिक्षणात राज्यातील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि अन्य पॅरामेडिकल कर्मचारी यांचा समावेश आहे. तसंच, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचा यात समावेश असून टप्प्याटप्प्यात हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या सातारा आणि पुणे जिल्ह्यातील ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात ३०० हून अधिक पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत. हे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी जिल्ह्यात कर्करोग टाळण्यासाठी प्रयत्न करू शकतील.


जनजागृतीसाठी टेक्नोलॉजीचा वापर

या कर्मचाऱ्यांना आयटी मुंबईतर्फे टॅबलेट्स पुरवले गेले आहेत. त्यात व्हिडिओ बेस ट्युटोरिअल असणार आहे. त्या ट्युटोरिअलमध्ये कॅन्सर आहे का? किंवा कोणत्या प्रकारचा आहे? तो कसा ओळखावा? याचा व्हिडिओ तयार करून देण्यात आला आहे. या प्रशिक्षणात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग या कर्करोगांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं जात आहे, असं प्रिव्हेंशन अॅन्कोलॉजी विभागातील डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सांगितलं.

कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करत आहोत. बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कॅन्सरचं लवकर निदान व्हावं, यासाठीचा हा प्रयत्न आहे. तसंच राज्य सरकारच्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवली जात असल्याचं टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितलं.


फक्त अशिक्षितच नाही तर अनेकदा चांगले सुशिक्षित लोकही कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर येतात. त्यामुळे किमान वर्षातून २ वेळा स्वत:च स्क्रिनिंग करून घेतलं पाहिजे. कर्करोग पूर्वस्थितीत लक्षात आल्यास त्वरीत उपचार करून रुग्णाला वाचवता येतं.

डॉ. गौरवी मिश्रा, प्राध्यापक, प्रिव्हेंटिव्ह अॅन्कोलॉजी विभाग


आतापर्यंत टाटा रुग्णालयात अनेकांना कर्करोगाबाबत प्रशिक्षण दिलं गेलं आहे. जिल्ह्यात उपचार मिळावेत, यासाठीही रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील आहे. आता, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण दिल्यामुळे कॅऩ्सरवर प्रतिबंध घालण्यास मदत होईल, असं टाटा रुग्णालयाचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितलं. शिवाय, अमेरिकेत ३९९ रुग्णांच्या मागे एक डॉक्टर आहे. तर, भारतात ३ हजार रुग्णांच्या मागे १ डॉक्टर आहे. त्यामुळे अनेकदा उपचार करणं कठीण होतं, अशी खंत डॉ. श्रीखंडे यांनी बोलून दाखवली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा