'या' सवयींमुळे शहरी महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सर

बदललेल्या जीवनशैलीमुळे, व्यसनाच्या विळख्यात सापडल्याने महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे.

SHARE

बदललेलं लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या सवयी, अनियमित मासिक पाळी, धुम्रपान, मद्यपान अशा अनेक कारणांमुळे शहरांत राहणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगा (ब्रेस्ट कॅन्सर)चं प्रमाण वाढलं आहे.

ऑक्टोबर महिना स्तन कर्करोगाच्या जनजागृतीचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती केली जाते.


टाटा हॉस्पिटलचा सर्व्हे काय म्हणतो?

ग्रामीण भागात स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी आहे. १ लाखात ९ टक्के महिलांना स्तनाच्या कर्करोगाला सामोरं जावं लागत आहे. तर, शहरी भागात १ लाखात २५ ते ३० टक्के महिलांना स्तनाच्या कर्करोगाची लागण होत असून हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं टाटा हाॅस्पिटलचा सर्व्हे सांगतो.


स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं

 • स्तनात गाठ तयार होणे
 • स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडणे
 • स्तनाच्या त्वचेचा रंग व पोतात बदल
 • बोंडशीत बदल
 • बोंडशीतून रक्त अथवा रंगहीन स्राव येणे


स्त्रियांमध्ये ४० वर्षांवरील महिला तसेच ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे अशा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो. ज्या स्त्रियांना मासिक पाळी लवकर सुरु झाली आहे, ज्या स्त्रिया स्थूल आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेत आहेत, अशा स्त्रियांनाही स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असते. वयाच्या तिशीनंतर मुले झाली असतील तर अशा स्त्रियांनाही धोका असू शकतो.


घरच्या घरी कसं कराल परिक्षण ?

 • दर महिन्याला मासिक पाळी आल्यानंतर ७ व्या दिवशी हाताच्या मधल्या बोटाने स्तनाचं परिक्षण करावं
 • स्तनात गाठ आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका
 • वर्षातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या
 • स्तनाच्या कर्करोगाचं वेळेत निदान झालं तर कर्करोग ९० टक्के बरा होऊ शकतो  


दोन चाचण्या महत्त्वाच्या 

वयाच्या पस्तीशी, चाळीशीनंतर स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढतं. त्यासाठी नित्यनियमाने 'मैमोग्राफी' आणि 'बायोप्सी' या दोन चाचण्या करणं गरजेचं असतं. 'मैमोग्राफी' या चाचणीला फक्त अर्धा तास जातो. वेळोवेळी स्तनांमध्ये गाठ नसल्याची खात्री करुन घेणं गरजेचं असतं.


काय काळजी घ्याल?

 • वयाच्या ३५ शी नंतर वर्षातून एकदा 'मैमोग्राफी' टेस्ट करावी
 • अधिक चरबीयुक्त, तेलयुक्त आहार घेणं टाळावं
 • हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळांचा आहारात अधिक समावेश करावा  
 • नियमित व्यायाम, योगासने करावीत, मानसिक ताण-तणावापासून दूर राहावं 


स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण आणखी वाढू शकतं. पण, योग्य वेळेत निदान झाल्यास तो बराही होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी, मुलींनी स्वत: परिक्षण करणं गरजेचं असतं. धुम्रपान, मद्यपान, बदलता आहारामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो म्हणून जीवनशैलीत बदल केला पाहिजे. 

- प्रा. डॉ. ज्योती बाजपेयी, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, टाटा हॉस्पिटलहेही वाचा -

पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना ब्रेस्ट कॅन्सर स्वपरिक्षणाचे धडे

१०४ क्रमांकांवर फोन करा, धावत येईल वैद्यकीय अधिकारीसंबंधित विषय
ताज्या बातम्या