शासकीय रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत गंभीर स्वरुपाचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशावेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास रुग्णांची गैरसोय होते. या परिस्थितीत नातेवाईकांना कोणाशी संपर्क साधवा हे सुचत नाही. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने १०४ (टोल फ्री) क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास आरोग्य सल्ला संपर्क केंद्रात तक्रार दाखल होऊन रुग्णाच्या उपचारासाठी त्वरीत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईल.
त्याचबरोबर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क न झाल्यास त्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यास किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास तक्रारीचं निवारण करण्याबाबत कळविण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून राज्यभर ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
आपत्कालीन परिस्थितीत पहिला अर्धा तास बहुमूल्य (Golden Hours) असतो. या कालावधीत रुग्णांवर उपचार झाल्यास त्यांना होणारा त्रास, मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल. जेणेकरुन रुग्णांचा सार्वजनिक आरोग्यर सेवेवरचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
या सुविधेमुळे ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसेल, तेथे नजीकच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पाठवता येईल किंवा रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवता येईल. ही सुविधा देताना ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर असतील तेथील गंभीर रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
शासकीय दंत महाविद्यालयात सुरू होणार ओरल कॅन्सर विभाग
५०० वर्षांच्या जुन्या पद्धतीनं 'तिला' मिळालं नवं नाक!