रोज मद्यपान केल्यास होईल स्तनांचा कर्करोग

 Mumbai
रोज मद्यपान केल्यास होईल स्तनांचा कर्करोग

तुम्ही दररोज मद्यपान करत असाल, तर तुम्हाला स्तनांचा कर्करोग होऊ शकतो, अशा आशयाचा नवा अहवाल ‘वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. प्रत्येक दिवशी अर्धा ग्लास वाईन, दारू अथवा बिअरच्या छोट्या कॅनचं सेवन केल्यास स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. मात्र, नियमित व्यायाम केल्यानं या दुर्धर आजारावर मात देखील करता येऊ शकते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

भारतात स्तनांच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 'कॅन्सर रिसर्च यूके'नं स्तनांचा कर्करोग होण्याची संभाव्य 18 कारणं आपल्या अहवालात नमूद केली आहेत. मद्यपेय हे त्यापैकी एक महत्वाचं कारण आहे. संतुलीत आहार, नियंत्रीत वजन आणि व्यायामाच्या आधारे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

1.2 कोटी महिलांच्या वैद्यकीय उपचारांचा अभ्यास -
100 हून अधिक महिलांच्या अभ्यासातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या संशोधनात 1.2 कोटी महिलांच्या वैद्यकीय उपचारांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासक्रमाद्वारे वैज्ञानिकांना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रत्येक दिवशी एक छोटा ग्लास वाईन, दारूचे सेवन तसंच मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते.

शंभरपैकी 13 महिलांना शक्यता -
त्यामुळे 100 महिलांपैकी जवळपास 13 महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यातही महिला नियमित अतिरिक्त मद्य सेवन करत असतील, तर स्तन कर्करोग पीडित महिलेची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसंच महिलांचे वय 50 हून अधिक असल्यास, महिलांची मासिक पाळी बंद झाली असल्यास किंवा एखाद्या महिलेच्या कुटुंबात स्तनाचा कर्करोग अनुवंशिक आजार असल्यास स्तनांच्या कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो.

मद्यपानामुळे महिलांना स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. कारण महिला ज्यावेळी मद्यपान करतात तेव्हा त्यांचं इस्ट्रोजन लेवल वाढू शकते. त्यामुळे त्यांना स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. हल्ली महिलाही मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात. त्यामुळे त्यांना हा आजार होऊ शकतो.
डॉ. ध्येर्यशील सावंत, ऑन्कोलॉजिस्ट

Loading Comments