लढाई कोरोनाशी: होय, कोरोनाला हरवता येतं!

ओळखीत कुणा ना कुणाला कोरोनाची लागण झाल्याचा अनुभव जवळपास प्रत्येकालाच असेल. ओळखीत कुणाला कोरोना झालाच, तर तुम्ही त्याला मानसिक आधार देऊ शकता जो त्याच्यासाठी अतीव महत्त्वाचा असेल. तो देताना हात आखडता घेऊ नका, ही हात जोडून विनंती... 

अत्याधुनिक तंत्रज्ञान, दक्ष कर्मचारी, सकारात्मकता आणि दैवी कृपा या सगळ्याच्या बळावर मी कोरोनावर मात केली. पण माझी लढाई सुरू असताना घरी दुसरा एक लढा सुरू होता. मी अस्तित्वाची लढाई लढताना माझ्यासह ऋतुजाही कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानं अनेकांनी आमचं अस्तित्वच पुसलं. आम्हाला घरासह वाळीत टाकलं गेलं. या असह्य तणावामुळे कित्येक रात्री रडून काढल्याची कबुली ऋतुजानं नंतर दिली. पण अशा वणव्यात प्रेम, आपुलकीच्या शिडकाव्यानं आयुष्यात गारवा आणणारे मित्रही लाभले. त्यांच्यामुळे या कठीण परिस्थितीतून बाहेर पडणं शक्य झालं.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची बातमी समजताच घराच्या गेटवर प्रतिबंधित क्षेत्राचा बॅनर लागला. बांबू आडवे लावून घराचं गेट बंदच करण्याची तयारी होती. पण घरी वयस्कर आजी आहे, तिला काही झालं तर काय करायचं असा प्रश्न विचारून मुलीनं त्यांना थोपवलं. प्रतिबंधित क्षेत्र असल्यानं कुणी घरी येऊन हवं-नको विचारण्याचा प्रश्नच नव्हता. पण किमान कॉल वा मेसेज करून खुशाली विचारणं, धीर देणं अनेकांनी फोनमधून कोरोनाचं संक्रमण होणार असल्यागत टाळलं. कितीही नाही म्हटलं तर त्याचं दुःख झालंच. अशांशी जशास तसं वागायचं असा निर्धार केला होता. पण आपल्यात माणुसकी असेल, तर ठरवूनही तसं वागता येत नाही. 

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: आयसीयूला निरोप!

दुसरीकडे नातं-गोतं, सख्खं-सावत्र या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे सुहृदही सोबत आहेत, याची खात्री पटली. घरी जेवण-नाश्ता, औषधांसह हवं नको ते सगळं पोहोचवणारे अमेय जोशी, जितेंद्र ओक, प्रसाद धोंड्ये, घरासमोर राहाणारा संजय मौर्य, विनोद गायकर... ऋतुजाला सतत फोन करून धीर देणाऱ्या मेधा मनोज आणि मेधा अभिजित जोशी, जेताश्री गडकरी, ओमकार आणि स्मिता कुलकर्णींसह, किरण काळे, चित्रा देसाई, नितीन पेवेकर, बाळकृष्ण शिंदे, हेमांगी यांच्यासारख्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनीही आवर्जून विचारपूस केली. डॉ. मिलिंद पैठणे, विनायक महाजन आणि सोमनाथ पाटील यांचं ऋण तर फेडता येणारच नाही. तुषार शेट्ये आणि अमृता कारेकर हे माझे पत्रकारितेतले विद्यार्थी. तुषार सतत ऋतुजाशी संपर्कात होता. काहीही लागलं तर मला अर्ध्या रात्री फोन करा सांगणारा तुषार ऋतुजालाही भावला. कारण भावासारखी मदत करतो म्हणताय मॅडम, तर मला अहो-जाहो कशाला करता? मी लहान आहे तुमच्यापेक्षा. मला तूच म्हण सांगणाऱ्या तुषारचा एक माणूस म्हणून दिसलेला चेहरा आश्वासक होता. अमृतानंही आम्हा दोघांना नेहमीच धीर दिला. केडीएमसीतले उच्चपदस्थ मिलिंद धाट यांचाही मदतीचा हात कधीच आखडला नाही.

रुग्णालयात असल्याचं समजताच फोन करून धीर देणारे, हे लिहाच म्हणून आग्रह करणारे मिलिंद सबनीस, काहीही लागलं तर फक्त टेक्स्ट कर सांगणारे निनाद वैद्य हे मित्र-परिवारात असणं भाग्यच. ऋतुजाच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनीही या कठीण परिस्थितीत मदत केली. सेव्हन हिल्ससाठी गाडीची व्यवस्था करणारा सुशील आंबेरकर दोघाचांही मित्र, सेव्हन हिल्समध्ये मी दाखल होईपर्यंत रस्त्यावर ताटकळणारा निरंजन ओक, मकरंद गणपुले, अबोली ठोसर, पराग चाचड, विवेक पावसकर, गुरू देशपांडे यांच्यासह दररोज फोन करून माझी विचारपूस करणाऱ्या तिच्या-माझ्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींना सलाम... माझे भाऊ निलेश गटणे, हरेश पोतदार आणि अजय कुलकर्णी यांचीही नावं घ्यावीच लागतील. डिस्चार्ज घेताना तिथे कुणी तरी असणं गरजेचं होतं. अजय एका फोनवर धावत आला... बाहेर पडलो, कॅबमध्ये बसलो. त्याचा निरोप घेत सुखरूप घरी परतलो.

वैद्यकीयदृष्ट्या शक्य असेल (मला शुगर आहे) तर ४५ दिवसांनंतर मला आणि ऋतुजालाही प्लाझ्मा डोनेशन करायचंय. कोरोना रुग्णासाठी ती सगळ्यात मोठी मदत ठरेल... दुर्दैवानं ते शक्य नसलंच, तर माझ्या अनुभवांतून एखाद्याला धीर मिळावा, म्हणून हे सगळं लिहिलं. 

एकच सांगतो, कोरोनानं गाठलं तरी हातपाय गाळू नका. सकारात्मक राहा... कोरोनालाही हरवता येतं!

समाप्त.

- दिनार पाठक

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: रुग्णवाहिकेचं भाडं फक्त २२ हजार

पुढील बातमी
इतर बातम्या