Advertisement

लढाई कोरोनाशी: रुग्णवाहिकेचं भाडं फक्त २२ हजार

कोरोनाच्या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारनं धडाकेबाज निर्णय घेऊन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न कसा केलाय हे आपण अनेकदा ऐकलं, पाहिलं आणि वाचलं असेलच. पण वस्थुस्थिती वेगळीच आहे.

लढाई कोरोनाशी: रुग्णवाहिकेचं भाडं फक्त २२ हजार
SHARES

कल्याणच्या खासगी रुग्णालयानं एकामागोमाग एक झटके दिले. तो मनस्ताप कुटुंबात असूनही एकट्या ऋतुजानं कसा झेलला, तिलाच माहिती. स्वतःची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं टेन्शन बाजूला ठेवून ती माझी लढाई लढत होती. तुझी बायको एकदम हेडस्ट्राँग आहे, झाशीची राणी आहे... मित्रांच्या या प्रतिक्रिया खूपच बोलक्या आहेत. पण या परिस्थितीत मनस्ताप टळता, तर बरं झालं असतं...

तुम्ही वाचलंत ते बरोबरच आहे. यात कुठलीही टायपिंगची चूक नाही. चक्की नाका, कल्याण ते सेव्हन हिल्स हॉस्पिटल, मरोळ हे अंतर आहे ४४ किलोमीटरचं. हा प्रवास करताना मला गरज लागणार होती ती कार्डिॲक ॲब्युलन्सची. ही ॲब्युलन्स मी ॲडमिट होतो त्या कल्याणमधल्या खासगी रुग्णालयानं उपलब्ध करून दिलीही. पण त्यासाठी मोजावे लागले ते २२ हजार रुपये...! म्हणजेच ५०० रुपये किलोमीटर. कोरोनाच्या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारनं धडाकेबाज निर्णय घेऊन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न कसा केलाय हे आपण अनेकदा ऐकलं, पाहिलं आणि वाचलं असेलच. पण वस्थुस्थिती वेगळीच आहे. या प्रवासाला २२ हजार मोजावे लागल्यानंतर कल्याणहून एअरलिफ्ट करण्यात आलं की काय, असा प्रश्न मला पडला होता.

२८ जुलैला सकाळी साडे अकरा वाजता कल्याणच्या त्या रुग्णालयातून मला डिस्चार्ज मिळाल्याची कागदोपत्री नोंद आहे. बिलाचा हिशोब पूर्ण झाल्याची ती वेळ असावी. पण ॲब्युलन्स काही आलेली नव्हती. तिची प्रतीक्षा सुरू असतानाच काही प्रोसिजर पूर्ण करायचं असेल, तर तुम्ही सेव्हन हिल्सकडे जा. ॲब्युलन्स येताच आम्ही पेशंटला पाठवू. ॲब्युलन्सला वाहतूक कोंडीचा त्रास नसतो. ती तुम्हाला गाठेलच किंवा तुम्ही आणि ती एकाच वेळी मरोळला पोहोचाल, असं सांगून ऋतुजाला पुढे जाण्यास सुचवण्यात आलं. ते पटल्यामुळे ती पुढे निघालीही. तिची धाकटी बहीण वेदश्री बर्वे कल्याणला आली होती. तिनंही सांगितलं की, ताई तू हो पुढे. इथून ॲब्युलन्स निघताच मी फोन करून तुला सांगतेच...

हेही वाचा- लढाई कोरोनाशी: बाय बाय कल्याण

त्यानंतर पाऊणेक तासांनी ॲब्युलन्स तिथे पोहोचली. मग पेशंटसोबत कोण आहे, असा प्रश्न रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात आला. त्यावर वेदश्रीनं तुम्हीच सांगितल्यानुसार ऋतुजा पुढे गेल्याचं सांगितलं. ते ठीक आहे, पण कुणी सोबत नसल्यास फक्त पेशंटला आम्ही पाठवणारच नाही, असं उत्तर देण्यात आलं. अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास झालेल्या ऋतुजाला तुम्ही परत या, त्याशिवाय पेशंटला पाठवणार नाही असं सांगण्यात आलं. मी परत येते. तोपर्यंत ॲब्युलन्स थांबेल ना, या तिच्या प्रश्नावर ते आम्ही सांगू शकत नाही असं शांतपणानं सांगण्यात आलं... अखेर ॲब्युलन्समधल्या डॉक्टरांनीच हा प्रश्न सोडवला. त्यांनी त्यांच्याकडचं एक पीपीई किट दिलं. वेदश्री हिंमत दाखवून माझ्यासोबत ॲब्युलन्समधून आली आणि तिला माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची परवानगी विक्रम बर्वेनं दिली. मी त्यांच्या या ऋणात कायम राहीन. माझा जीव वाचवण्यासाठी पुढे आलेल्या अनेक हातांपैकी चार हात या दोघांचेही होते. पीपीई किट देणारी आणि कल्याणच्या हॉस्पिटलनं पाच किलो ऑक्सिजन द्या असं सांगूनही प्रवासात माझी परिस्थिती पाहून तो १५ किलो करणारी ती महिला डॉक्टर, वेदश्री किंवा शास्त्रीनगर रुग्णालयात उपासमार टाळणारी ती महिला... कुलदेवता माझ्या पाठीशी होती, हेच खरं.

डिपॉझिट असूनही पैसे भरा सांगणारं, डिस्चार्ज घेतल्या दिवसासह तीन दिवसांचे पैसे घेताना २८ जुलैला सकाळचं जेवणही न देणारं, डेबिट कार्ड स्वीकारण्याचेही ६०० रुपये आकारणारं ते खासगी रुग्णालय एकीकडे आणि सेव्हन हिल्सला पोहोचताच वेदश्रीला पीपीई किट काढायला मदत करणारे, सॅनिटाइझही करून देणारे ॲब्युलन्समधले कर्मचारी दुसरीकडे... 

वाहत्या गंगेत हात धुऊन घेणारे आणि माणुसकी शिल्लक असलेले... दोघेही अवती-भवती होते. क्रमश:

- दिनार पाठक

हेही वाचा- लढाई कोरोनाशी: खासगी रुग्णालयातला मनस्ताप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा