Advertisement

लढाई कोरोनाशी: खासगी रुग्णालयातला मनस्ताप

कोव्हिड १९मुळे अनेकांचे मुखवटे गळून पडले आणि खरे चेहरे दिसू लागले, अशी काहीशी ती पोस्ट होती... असे बरेच चेहरे उघडकीस येणार होते. आम्ही त्याचे साक्षीदार ठरणार होतो...

लढाई कोरोनाशी: खासगी रुग्णालयातला मनस्ताप
SHARES

शास्त्रीनगरचा निरोप घेऊन कल्याण पूर्वेतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल झालो. मला थेट आयसीयूमध्ये नेण्यात आलं. शास्त्रीनगरचा तो जनरल वॉर्ड आणि हे आयसीयू म्हणजे फार मोठा बदल होता. पण चकाकतं ते सगळं सोनंच नसतं, या म्हणीचा प्रत्यय यायचा होता. कोरोना अवतरला तेव्हा मी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. कोव्हिड १९मुळे अनेकांचे मुखवटे गळून पडले आणि खरे चेहरे दिसू लागले, अशी काहीशी ती पोस्ट होती... असे बरेच चेहरे उघडकीस येणार होते. आम्ही त्याचे साक्षीदार ठरणार होतो...

कल्याणच्या रुग्णालयतालं वातावरण पाहूनच मला अर्धं बरं झाल्यासारखं वाटू लागलं. तिथले कर्मचारीही खूपच प्रेमानं बोलत होते. पण, थोड्याच वेळात ऋतुजा कुठे आहे, अशी विचारणा मला करण्यात आली. तोवर ती मला रुग्णालयात दाखल करून घरी गेली होती. तिचा फोन नंबर मी तिथल्या एका नर्सना दिला. त्यांनी फोन लागत नसल्याचं सांगितलं. प्रवासात असल्यानं फोन लागत नसेल, पुन्हा प्रयत्न करा. ५-१० मिनिटांत नक्की लागेल, असं मी त्यांना म्हणालो. त्यावर तुम्हाला काही इंजेक्शन्स खूप तातडीनं द्यायची आहेत. त्याचे पैसे भरावे लागणार आहेत, असं मला सांगण्यात आलं. त्याही परिस्थितीत मी कसे-बसे ऑनलाइन पैसे भरले. मग बरीच औषधं आली आणि उपचार सुरू झाले... नंतर मला समजलं की, औषधांसाठी पैसे भरावेच लागतील असं मला सांगितलं गेलं तेव्हा ऋतुजानं डिपॉझिट म्हणून तब्बल १ लाख रुपये भरले होते. पॅथॉलॉजीचे १५ आणि औषधांसाठीचे १५ हजार वेगळेच. तरीही औषधांसाठी १० हजार ८०० रुपये मला त्याही परिस्थितीत भरायला लावण्यात आले होते... 

चकाचक दिसणाऱ्या या रुग्णालयाचा खरा चेहरा किती भेसूर आहे, हे त्या एका प्रसंगातूनच लक्षात यायला हवं होतं. पण वेळ आलेली नव्हती. 

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: उपाशी राहून कसं चालेल?

२५ जुलैस संध्याकाळी आठच्या सुमारास मी या रुग्णालयात दाखल झालो होतो. केडीएमसीनं दिलेल्या रुग्णवाहिकेतूनच मला तिथे नेण्यात आलं होतं. त्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधा नव्हती. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण पूर्व हा प्रवास आणि रुग्णालयातल्या बेडपर्यंत पोहोचेपर्यंत मी ऑक्सिजनशिवायच होतो. पण ते जमलं, इतकंच म्हणता येईल. आधी म्हटल्याप्रमाणे तिथे उपचार सुरू झाले. मग ऋतुजा घरी पोहोचल्यावर तिचा फोन आला. तिथल्या नर्सशी तिचं बोलणंही करून दिलं. त्यानंतर ऋतुजानं पुन्हा फोन करून मला पैसे भरल्याची कल्पना दिली. तू कुणालाही एक रुपयाही देऊ नकोस. माझ्याशी बोलायला सांग, असं तिनं निक्षून सांगितलं. पुढच्या २-३ दिवसांत रुग्णालयातून तिला वेगवेगळ्या कारणांसाठी फोन गेले. अमूकसाठी पैसे भरा, तमूकसाठी पैसे भरलेच नाहीत म्हणणाऱ्यांना तिनं पैसे भरल्याच्या पावत्याही आहेत सांगितल्यावरही पावत्या दाखवायला निर्लज्जपणानं सांगण्यात आलं. त्यावर तुमचे रेकॉर्डस तुम्हीच नीट तपासा असं खडसावल्यावर हे प्रकार थांबले. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर ऋतुजा घरच्या वाटेवर असतानाच तिला रुग्णालयातून फोन गेला होता. त्यावर तुम्ही घरी का गेलात, असा प्रश्न विचारला. रुग्णालयातूनच सांगण्यात आल्यावर मी गेले असं तिनं सांगितल्यावर आम्हालाही सांगून का गेला नाहीत, असा संतापजनक प्रश्न विचारण्यात आला. हे सगळं करणाऱ्या रुग्णालयातून माझी प्रकृती कशी आहे, हे सांगण्यासाठी डॉक्टरांकडून होणारे फोन मात्र नगण्य होते. अखेर, कुठलेही पैसे भरणार नाही, अशी ठाम भूमिका मी घेतली. 

तोपर्यंत माझी अवस्था खालावली असावी. कारण दिवस उजाडला-मावळला हे मला नीटसं समजत नव्हतं. शिफ्ट बदलल्या असं वाटत होतं. प्रत्यक्षात, दिवस बदलत होते.

दरम्यान, ऋतुजाची स्वॅब टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. मुली आणि माझ्या आईच्या टेस्टचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह होता... 

थोडक्यात लढाई आता एकसाथ दोन आघाड्यांवर सुरू झाली होती. क्रमश:

- दिनार पाठक

हेही वाचा- लढाई कोरोनाशी: शास्त्रीनगर रुग्णालयातली रात्र...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा