Advertisement

लढाई कोरोनाशी: बाय बाय कल्याण

मुंबईपर्यंतचा प्रवास शक्य होईल का, हाच काळजीचा विषय होता. पण, मी पुन्हा एकदा ठामपणानं मला जमेल सगळं असं ऋतुजाला सांगितलं. जे काही बरं-वाईट होईल, त्याची जबाबदारी माझीच असेल असंही मी स्पष्ट केलं...

लढाई कोरोनाशी: बाय बाय कल्याण
SHARES

धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं... कल्याणातला मुक्कामाची अवस्था ही होती. ऋतुजाला मनस्ताप होत होता. त्यातच तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मुली आणि माझ्या आईची टेस्ट मात्र सुदैवानं निगेटिव्ह होती. पण त्या तिघींना कुठे हलवतात का, याचं नवंच टेन्शन डोक्यावर आलं. सुदैवानं ऋतुजाला झालेली लागण सौम्य होती. ती एका मजल्यावर आणि मुली आणि माझी आई वेगळ्या मजल्यावर राहाणं शक्य होतं. त्यामुळे होम क्वारंटाइनवर भागलं. 

बदलणारे दिवस समजत नसले, तरी रुग्णालयात आजू-बाजूला काय सुरू आहे हे मला समजत होतं. ते मी ऋतुजाला सांगूही शकत होतो. एका गोष्टीची कबुली देतो... मला हॉस्पिटलचा फोबिया होता. आजवर फक्त एकदा मला गॅस्ट्रोसदृश्य त्रास झाला होता. तेव्हा आयुष्यातलं पहिलं सलाइन घ्यावं लागलं. ही गोष्ट साधारण १०-१२ वर्षांपूर्वीची. नंतरच्या काळात भावाला झालेला कॅन्सर आणि वडील-सासरे यांचे रुग्णालय मुक्काम यामुळे अनेकदा हॉस्पिटलमध्ये जाणं झालं. पण रात्रभर रुग्णालयात थांबण्याची मला भीतीच वाटत होती. त्यामुळे दिवसभर मी एकटा थांबेन, पण रात्री दुसऱ्या कुणीतरी इथे थांबा असंच मी सांगायचो. इतकंच कशाला, ब्लड प्रेशर चेक करतानाही हृदयाची धडधड वाढायची...

हेही वाचा- लढाई कोरोनाशी: खासगी रुग्णालयातला मनस्ताप

स्वाभाविकच मला रुग्णालयातला मुक्काम कसा जमेल, याचंही ऋतुजाला टेन्शन होतं. पण अर्धं कळतंय आणि अर्धं कळतच नाही, अशा अवस्थेमुळे बहुधा मला त्या एकटेपणाचा त्रास झाला नाही. कल्याणच्या त्या रुग्णालयात तुमचा सीटी स्कॅन करावा लागणार आहे, असं सांगण्यात आलं. मी स्पष्ट नकार दिला. एमआरआय मशीनचा फोबिया आहे. तुम्ही गुंगीचं किंवा झोपेचं औषध देऊन ते करवून घ्या असंही मी सांगितलं. पण त्या यंत्रात तुम्ही फार तर अर्धा मिनिटच असता. सीटी-स्कॅनला एमआरआयइतका वेळ लागतच नाही, असं मला कुणीही सांगितलं नाही. ते समजतं, तर हिंमत केलीही असती. झोपेच्या औषधांचा पर्याय शक्य असेल वा नसेल, माहिती नाही. पण स्कॅनिंगसाठी पेशंट को-ऑपरेट करत नाही, हे मात्र अगदी तातडीनं ऋतुजाला सांगण्यात आलं. पेशंटला कन्व्हिन्स करणं हे तुमचं काम आहे, असं तिनं शांतपणानं सुनावल्यावरही मी को-ऑपरेट करत नसल्याचंच पालुपद सुरू होतं. सीटी-स्कॅनिंगला खूप वेळ लागत नाही, घाबरू नका वगैरे वगैरे मला कुणीच का सांगितलं नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

अखेर मला मुंबईला हलवण्याचं ठरलं. माझे शाळकरी मित्र डेंटिस्ट मिलिंद पैठणे आणि विनायक महाजन यांचा या निर्णयात सहभाग होता. मुंबईपर्यंतचा प्रवास शक्य होईल का, हाच काळजीचा विषय होता. पण, मी पुन्हा एकदा ठामपणानं मला जमेल सगळं असं ऋतुजाला सांगितलं. जे काही बरं-वाईट होईल, त्याची जबाबदारी माझीच असेल असंही मी स्पष्ट केलं. मग कल्याणहून हलवायचं ठरलं.

२८ जुलैला सकाळीच डिस्चार्ज घेऊन मरोळ-अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये जाणं निश्चित झालं. त्या रुग्णालयाशी संलग्न असलेला आणखी एक शाळकरी मित्र सोमनाथ पाटील, हे तिथेच जाण्यामागचं कारण होतं. ठरल्यानुसार ऋतुजा कल्याणच्या रुग्णालयात साडेनऊच्या सुमारास पोहोचली. डिपॉझिट परत करणं आणि अन्य सोपस्कारांना दोन तास लागले. मग सुरू झाली रुग्णवाहिकेची प्रतीक्षा. तोवर प्रोसिजर सुरू करण्यासाठी तुम्ही पुढे गेलात तरी चालेल, असं ऋतुजाला सांगण्यात आलं. त्यानुसार ती गेलीही. 

रुग्णवाहिका आल्यानंतर मात्र पेशंटसोबत कुणीच नसेल, तर आम्ही सोडणारच कसं असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. रुग्णालयात आलेली माझी मेव्हणी वेदश्री बर्वेनं क्षणाचाही विचार न करता मी जाईन असं सांगितलं आणि ती सोबत रुग्णवाहिकेतून पीपीई किट घालून सोबत आलीही. अन्यथा मला तिथेच डांबून ठेवण्याचा बहुधा त्या रुग्णालयाचा प्लॅन असावा...

ही शंका येण्यामागची कारणंही तशीच होती... क्रमश:

- दिनार पाठक


हेही वाचा - लढाई कोरोनाशी: उपाशी राहून कसं चालेल?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा