Advertisement

लढाई कोरोनाशी: आयसीयूला निरोप!

आयुष्यातलं पहिलंच रुग्णालयातलं वास्तव्य प्रदीर्घ आणि एकटं पाडणारं ठरलं होतं. पण या सगळ्या परिस्थितीतही कटाक्षानं सकारात्मकच राहिलो. त्याचा खूपच फायदा झाला.

लढाई कोरोनाशी: आयसीयूला निरोप!
SHARES

सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झालो २८ जुलैच्या दुपारी. १६ ऑगस्टला कोरोनामुक्त होऊन मी घरी परतलो. योग्य उपचार मिळाले, सकारात्मक राहिलो तर कोरोना हरवता येतं याची जाणीव झाली. आयुष्यातलं पहिलंच रुग्णालयातलं वास्तव्य प्रदीर्घ आणि एकटं पाडणारं ठरलं होतं. पण या सगळ्या परिस्थितीतही कटाक्षानं सकारात्मकच राहिलो. त्याचा खूपच फायदा झाला.  

सेव्हन हिल्समधल्या आयसीयूतून वॉर्डमध्ये गेलो, ३ ऑगस्टला. दुपारी साधारण दोनच्या सुमारास मी ३०७३चा निरोप घेतला. दोघांची व्यवस्था असलेल्या खोलीत मला हलवण्यात आलं. नवीन पत्ता होता, ७२४४ सी ब्लॉक. तिथे खिडकीतून थोडं बाहेरचं जग दिसत होतं. खोलीत टीव्हीसुद्धा होता. खोलीत माझ्या आधीपासूनच सावंत नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याशी गप्पा होत होत्या, टीव्ही-बातम्या बघून जगाशी पुन्हा नाळ जोडली जात होती...

कोव्हिडशी सुरू असलेल्या लढ्यात सरशी होत असल्याची चिन्हं दिसू लागली होती. ५ ऑगस्टला सकाळी कोव्हिड टेस्टसाठी स्वॅब घेण्यात आला होता. ७ ऑगस्टला पुन्हा स्वॅब घेण्यात आला. ५ तारखेच्या टेस्टचा रिपोर्ट समजला नव्हता. पण संध्याकाळी तो समजला. रिपोर्ट निगेटिव्ह होता. संध्याकाळी रुग्णालयातून तसं ऋतुजाला अधिकृतरीत्या कळवण्यातही आलं. या खुशखबरीनंतर ऋतुजानं केलेल्या व्हिडीओ कॉलवर दोघांच्याही अश्रूंचे बांध कधी फुटले, ते समजलंच नाही. फक्त, हे आनंदाश्रू होते...

त्यानंतर थोड्याच वेळात रात्रीचं जेवण आलं. जेवून होत नाही, तोच दोन कर्मचारी खोलीत आले आणि त्यांनी मला दुसऱ्या खोलीत जायचंय सांगितलं. एकानं सगळं सामान पटापट आवरलं आणि दुसऱ्यानं मला व्हीलचेअरमध्ये बसवून खोलीबाहेर काढलंही.. त्यांनी सातव्या मजल्यावरून मला सहाव्या मजल्यावर हलवलं. नवा पत्ता होता ६१७४, सी ब्लॉक. 

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: मृत्युच्या खोल दरीत... आणि परत

या खोलीत मी एकटाच होतो. त्यामुळे विचारांना अधिक चालना मिळाली. निग्रह पक्का करण्यासाठी मेडिटेशन, व्यायाम सहजशक्य होतं. शुगर चेक करण्यासाठी मला पहाटे ४ वाजता उठवत होतेच. मग ब्रश करून काही श्लोक, स्तोत्रं ऐकणं वगैरे मी सुरू केलं. डॉक्टरांच्या परवानगीनं पीटीचे व्यायाम सुरू केले. मी लवकर उठत असल्यामुळे स्पंजिंग लवकर मिळालं तरी चालेल असं सांगितल्यानं सकाळी ६ वाजेपर्यंत स्पंजिंगही आटोपू लागलं. काही श्लोक, अथर्वशीर्ष मग पीटीच्या व्यायामांना बेडचा आधार घेत बैठकांची जोड दिली. खोलीतल्या सोफ्याचा वापर करून पुश-अप्सचाही प्रयत्न केला. हे सगळं जमू लागलंही. खुर्चीवर जास्तीत जास्त वेळ बसणं तर होतंच. फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी दिलेलं थ्री बॉल स्पायरोमीटर तर लहान मुलाच्या खेळण्यासारखं सदैव हातातच असायचं. 

वॉर्डमध्ये हलवल्यावर एक-एक पाऊल टाकत निग्रहानं टॉयलेटपर्यंत जात होतो. मग मोबाइलमध्ये पेडोमीटर डाउनलोड करून चालायला सुरुवात केली. पाऊल टाकण्यासाठी धडपड करणारा मी आठेक दिवसांतच १६०० पावलं चालू लागलो होतो...

अर्थात या नव्या खोलीत आलो तरी माझ्या नाकातली नळी काही दिवस तशीच होती. चार, तीन, १ आणि शेवटी अर्धा लिटर ऑक्सिजन सुरू होता. व्यायामाचा फायदा झाला आणि एके दिवशी दुपारी गळ्यात पडलेली नळी एकदाची बाजूला झाली. 

हॉस्पिटलच्या नियमांनुसार पुढील ४८ तासांत मला काहीही त्रास झाला नाही, तर कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही मला डिस्चार्ज घेऊन १४ दिवस घरीच क्वारंटाइन होणं शक्य होतं.

पण मला हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का नको होता. लढाई आर या पारची होती आणि ती जिंकलो ही गोष्ट अतीव समाधान देणारी ठरणार होती. त्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह घेऊनच मला डिस्चार्ज घेऊन घरी यायचं होतं. तसं साकडंच मी देवाला घातलं होतं. ते देवानं ऐकलं कोरोनामुक्त होऊनच मी घरी परतलो...

कोव्हिडच्या या आजारपणात खूप काही शिकलो. अनेकांचे मुखवटे आणि चेहरे दिसले. त्याबद्दल पुढच्या आणि शेवटच्या भागात... क्रमश:

- दिनार पाठक

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: रुग्णवाहिकेचं भाडं फक्त २२ हजार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा