Advertisement

लढाई कोरोनाशी: मृत्युच्या खोल दरीत... आणि परत

मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात जणू माझा पुनर्जन्म झाला. असं म्हणण्याचं कारण म्हणजे तिथे पोहोचलो तेव्हा क्रिटिकल होतो आणि मला त्याची काहीही कल्पना नव्हती.

लढाई कोरोनाशी: मृत्युच्या खोल दरीत... आणि परत
SHARES

मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात जणू माझा पुनर्जन्म झाला. असं म्हणण्याचं कारण म्हणजे तिथे पोहोचलो तेव्हा क्रिटिकल होतो आणि मला त्याची काहीही कल्पना नव्हती. माझ्या शरीरातली ऑक्सिजनची लेव्हल ७० ते ८०च्या दरम्यान खाली-वर होत होती. १५ लिटर ऑक्सिजन देऊनही ती ९०च्या वर जात नव्हती. निरोगी माणसाची ही लेव्हल ९५ ते १०० असते. माझ्या फुफ्फुसांचं कोरोनानं किती नुकसान केलं होतं, ते समजण्यासाठी हे आकडेच पुरेसे ठरावेत.  

सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू होती. ऋतुजा ती पूर्ण करत असताना मेव्हणी वेदश्री मी झोपलो होतो, त्या स्ट्रेचरजवळ उभी होती. एक डॉक्टर तिथे आले. लांबूनच त्यांनी माझी अवस्था पाहिली आणि तिला तुम्ही या पेशंटसोबत आहात का, असं विचारलं. तिनं हो म्हणताच हे तुमचे कोण हा त्यांचा दुसरा प्रश्न होता. तिनं जिजाजी असं उत्तर दिलं. त्यावर ‘आम्ही डॉक्टर असतो. देव नाही. यांची परिस्थिती बघता तुम्ही जो कुठला मानता त्या देवाचा धावा सुरू करा. आम्ही संपूर्ण प्रयत्न तर करूच. पण सगळं आता देवाच्याच हाती आहे,’ असं म्हणून ते डॉक्टर निघून गेले.

दुसरीकडे कल्याणच्या रुग्णालयातून मला आयसीयूमध्येच ठेवावं लागणार असल्याची कल्पनाच सेव्हन हिल्समध्ये देण्यात आली नव्हती. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तातडीनं मित्रवर्य सोमनाथ पाटीलला आयसीयूबाबत कल्पना दिली. त्यानं तातडीनं आयसीयूची व्यवस्था केलीही. ॲब्युलन्सच्या स्ट्रेचरवर मी झोपलो होतो. रुग्णालयाचा स्ट्रेचर घेऊन तिथे दोघे आले. मला उचलून त्या स्ट्रेचरवर ठेवण्याची तयारी सुरू होती. मी शांतपणे त्यांना थांबवून स्वतःच या स्ट्रेचरवरून त्या स्ट्रेचरवर सरकल्याचंही आठवतंय.

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: रुग्णवाहिकेचं भाडं फक्त २२ हजार

मग सुरू झाली एकच धावपळ... स्ट्रेचर घेऊन आलेले चंद्रशेखर आणि जय अक्षरशः धावत स्ट्रेचर ढकलत होते. ३०७३ क्रमाकांची खोली माझी वाटच बघत होती. तिथे पोहोचताच पुन्हा स्ट्रेचरवरून मी स्वतःच बेडवर सरकलो. डॉक्टर खुशबू यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मला श्वास घेता येत नव्हता. मी पिण्यासाठी पाणी मागितलं. ते पिऊन होताच १५ किलो ऑक्सिजन देण्यास सुरुवात झाली आणि मला जरा हुशारी आली. तोवर आधीच्या उपचारांची फाइलही त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी मला तातडीनं सीटी-स्कॅनला नेण्यास फर्मावलं. मी त्यांना माझ्या फोबियाबद्दल सांगितलं. त्यांनी आणि सोमनाथनंही फोन करून फक्त एका मिनिटाचा प्रश्न असल्याचं सांगितलं... मी मान डोलावली. पुन्हा चंद्रशेखर-जय मला घेऊन गेले आणि सीटी-स्कॅन करवून परत घेऊन आले. माझ्या फुफ्फुसांचं ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं याच सीटी-स्कॅनमुळे स्पष्ट झालं होतं. त्याच रात्री मला प्लाझ्मा देण्यात आला आणि बहुधा माझी गाडी रुळांवर येण्याची सुरुवात झाली.

ट्रीटमेंट हळू-हळू लागू पडत होती. मी लोळत पडायचं नाही म्हणून खुर्ची मागवली होती. बेडशेजारी ती ठेवून बराच वेळ मी वायरी सांभाळत खुर्चीत बसायचो. पण स्वतःला मी प्रचंड सकारात्मक ठेवलं होतं. चंद्रशेखर, सुजय, वीरेंद्र असे तिथले कर्मचारी मित्रच झाले होते. डॉ. आशिष रोजच येऊन बोलत होते. १५ लिटरचा ऑक्सिजन पाच लिटरखाली गेला आणि मला वॉर्डमध्ये हलवण्याचं ठरलं. डॉ. आशिष यांनी तुमची केस म्हणजे चमत्कार असल्याचं सांगतानाच पन्नास वय असतानाही तुम्ही २५ वर्षांच्या तरुणाच्या तडफेनं लढलात, असं प्रमाणपत्रही दिलं. माझे प्रयत्न कमी पडणार नाहीत, हे आश्वासन मी दिलं होतं. माझा शब्द खरा ठरला होता. 

पण त्यात तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह वॉर्डबॉयपर्यंत सगळ्यांचाच मोठा वाटा होता. अद्ययावत यंत्रसामुग्रीला या कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचा चेहरा लागला होता. कुणी कधीच कशाचा कंटाळा केल्याचं आठवत नाही. या सगळ्यांच्या कार्यतत्परतेला कडक सलाम...

आयसीयूतून बाहेर आलो. थोडक्यात, पहिली परीक्षा पास झालो होतो... क्रमश:

- दिनार पाठक

संबंधित विषय