मुंबईतील 'ही' लॅब कोरोनाची चाचणी २००० रुपयात करणार

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोनाची चाचणी अधिकाधिक आणि वेगानं होणं गरजेचं आहे. यासाठी पालिका रुग्णालयात तर कोरोनाची चाचणी केली जात आहे. यासाठी कुठले पैसे आकारले जात नाहीत. तर आणखीन चाचण्या होण्यासाठी खाजगी लॅब आणि रुग्णालयांना देखील कोरोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. पण खाजगी लॅब किंवा रुग्णालये कोरोना चाचणीसाठी अधिक पैसे आकारत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पण मुंबईतल्या एका खाजगी लॅबनं कोरोना चाचणी कमी किमतीत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जात आहेत. पण थायरोकेअर नावाची लॅब कमी किमतीत कोरोना चाचणी करणार आहे. यासाठी थायरोकेअरनं पालिकेला पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनावरील चाचणी शुल्क आम्ही कमी करण्यास तयार आहोत. प्रत्येकी रुग्णामागे आम्ही दोन हजार रुपये आकारू.

बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल यांना लिहिलेल्या पत्रात थायरोकेअरनं म्हटलं आहे की, पालिकेनं गोळा केलेल्या प्रत्येक स्वाब नमुन्यांची चाचणी कमी खर्चात करू. यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये आम्ही आकारण्यास तयार आहोत. कोरोनाची चाचणी सार्वजनिक प्रयोगशाळेत विनामूल्य आहे. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळांमध्ये शुल्क ४ हजार ५०० रुपये आहे.

पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, राज्य सरकार अद्याप चाचणी किंमती कमी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांशी चर्चा करत आहे. यासाठी एक समितीही स्थापन केली गेली आहे. ज्याचे अध्यक्ष राज्याच्या आरोग्य आश्वासन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे असतील. चाचण्यांचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्ष आणि आरोग्य तज्ञांकडूनही प्रयत्न केले जात आहेत.


हेही वाचा

मुंबईत 'ह्या' १८ इमारती अतिधोकादायक

कोरोना रुग्णांच्या बेडसाठी वॉर्डमधील कंट्रोल रुमला करा कॉल, हे आहेत दूरध्वनी क्रमांक

पुढील बातमी
इतर बातम्या