लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोना विरोधात लसीकरण केलं जात आहे. अनेक ठिकाणी या लसीकरणास परवानगी देण्यात आली असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी आता २० खासगी रुग्णालयांनाही महापालिकेनं परवानगी दिली आहे. शिवाय, रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच लस देता येणार आहे. मंगळवारपासून लसीकरण सुरू होऊ शकणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक खासगी रुग्णालयांनी लसीकरण प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली होती. कोरोनाची लस या कर्मचाऱ्यांसाठी मोफत असल्यानं गैरवापर होण्याच्या शक्यता असल्यानं महापालिकेनं याला मंजुरी दिली नव्हती. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचंही लसीकरण सुरू झालं असून सोमवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळं लसीकरणाचं विकेंद्रीकरण केल्यास पहिल्या टप्प्याचं लसीकरण लवकर पूर्ण होईल या उद्दिष्टाने महापालिकेने इच्छुक २० खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी दिली आहे.

परवानगी देण्यात आलेल्या रुग्णालयांची तपासणी करून लसीकरणासाठी आवश्यक सोईसुविधांसह, लस साठवण्याची सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे का याची खातरजमा करण्यात आली आहे. को-विन अ‍ॅपचा वापर आणि लसीकरणाची प्रक्रिया याबाबत परवानगी दिलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर मंगळवारपासून या रुग्णालयांमध्ये लसीकरण केलं जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

यामध्ये मोठ्या रुग्णालयांचा समावेश असून, आणखी काही रुग्णालयं पुढे आल्यास तपासणी करून त्यांनाही परवानगी दिली जाणार आहे. कर्मचारी संख्या कमी असलेल्या, छोट्या रुग्णालयांना मात्र परवानगी देणं योग्य ठरणार नाही. त्यामुळं मोठ्या रुग्णालयांचा यासाठी विचार केला जाणार असल्याची माहिती, काकाणी यांनी दिली. मुंबईत रविवारपर्यंत सुमारे ९० हजार आरोग्य आणि सुमारे २४ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. मुंबईत सध्या पालिका आणि सरकारी रुग्णालयातील २२ केंद्रावर लसीकरण केलं जातं.

खासगी रुग्णालयांना त्यांच्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं रुग्णालयांनी अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या आणि याआधी लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसारच लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिली मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरी मात्राही त्यांच्याच रुग्णालयात घेता येणार आहे. लसीकरण प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सर्व काळजी घेण्यात येणार असल्याचंही काकाणी यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?

तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या