Advertisement

तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा
SHARES

एका बाजूला महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असताना दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा लाॅकडाऊनचं संकट घोघावू लागलं आहे. मागील काही दिवसांमाध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी आढावा घेतला. यानंतर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला. 

उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा आणि स्वच्छता राखा अशा सूचना सातत्याने प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तरीही नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरी आणि खासकरून ग्रामीण भागात तर कुणीच मास्क लावून फिरताना दिसत नाही. यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. हा हलगर्जीपणा न थांबल्यास लोकहितासाठी सरकारकडून कठोर निर्णय घेतले जातील आणि लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल.

जगातील अनेक देशांमध्ये कोरनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यांना नाईलाजाने लॉकडाऊन करावं लागलं. आपल्यातील अनेकांना याबाबत गंभीरताच उरलेली नाही, हे खरोखरच खूप काळजीचं आहे. काही गोष्टींमध्ये आपण वेळीच निर्णय नाही घेतले, तर अडचणींना सामोरं जावं लागेल.

हेही वाचा- काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील, अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मास्क वापरत नाहीत हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. 

कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही जण शिवजयंतीवर बंधनं का आणता? असा प्रश्न उपस्थित करुन नाहक राजकारण करत आहेत. कोरोनाच्या विषयावर राजकारण करुन कुणीही लोकांना भावनिक करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनाही नियम घालून दिले पाहिजेत, असंही अजित पवार (ajit pawar) म्हणाले. तसंच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून यासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ४ हजारावर नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोना लसीकरणात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास त्यांच्यावर पुन्हा भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(lockdown is last option to control coronavirus infection in maharashtra says health minister rajesh tope)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा