जागतिक क्षयरोग दिन - १८ वर्षीय विशालनं मिळवला टीबीवर विजय

१८ वर्षीय विशाल गिरे याला टीबीचं निदान झाल्यानंतर दहावीच्या परीक्षेला त्याला मुकावं लागलं होतं. पण आता त्यानं पुन्हा दहावीच्या परीक्षेसाठी बसण्याचा निर्णय घेतला आहे. विशालच्या दोन्ही फुफ्फुसात खूप पाणी जमा झालं होतं. डॉक्टरांनी औषध, गोळ्या देण्यास सुरुवात केली. पण, विशालवर शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानुसार विशालवर विंडो शस्त्रक्रिया करण्यात आली.

अनेकदा एखाद्या व्यक्तीला टीबी झाला आहे, याचं निदानच उशिरा होतं. त्यामुळे रुग्णावर उपचार करून त्याला वाचवणं डॉक्टरांसाठी कठीण होऊन जातं. याच परिस्थितीमुळे टीबी रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.

कल्याणमध्ये राहणाऱ्या विशालला २०१६ मध्ये टीबीचे निदान झालं. त्यानंतर कुटुंबियांने तात्काळ त्याला शिवडीच्या टीबी रुग्णालयात दाखल केले. जानेवारी २०१७ ला विशाल शिवडी टीबी रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर तब्बल ६ महिने विशाल रुग्णालयातच होता‌. ऑक्टोबर २०१७ मध्ये विशालवर विंडो शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि आता विशाल एकदम ठणठणीत बरा झाला आहे.

काय आहे विंडो शस्त्रक्रिया?

अनेकदा टीबी बरा होण्यासाठी डॉक्टर औषधोपचार करतात. पण शस्त्रक्रिया करूनही टीबीचा जंतू असलेला भाग काढून टाकला जाऊ शकतो. अशीच शस्त्रक्रिया विशालवरही करण्यात आली. विशालच्या दोन्ही फुफ्फुसात खूप पाणी झालं होतं. पू आणि पाणी झाल्यामुळे त्याला आधी औषधं सुरू करण्यात आली होती. पण डॉक्टरांनी विंडो शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याच्या एका फुफ्फुसाच्या आत छोटंसं छिद्र करून नळी टाकण्यात आली. ज्या नळीतून त्याचा पू (पस) आणि पाणी काढण्यात आलं. १९३५ पासून टीबी रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात आहे. पण अजूनही जनजागृती नसल्याकारणानं शस्त्रक्रिया हा पर्याय वापरला जात नाही.

वजनही वाढलं

विशाल जेव्हा टीबी रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हा त्याचं वजन ३९ होतं. पण, आता त्याचं वजन ५८ किलो एवढं आहे. टीबीवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, याबाबत आजही जनजागृती नसल्यामुळे शस्त्रक्रिया हा पर्याय वापरला जात नाही. पण टीबीवर छोट्या-छोट्या शस्त्रक्रिया केली जाऊ शकतात. तसं मार्गदर्शन जनरल फिजीशियन किंवा टीबी डॉक्टरांना दिलं पाहिजे, असं शिवडी टीबी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितलं.


हेही वाचा -

जागतिक क्षयरोग दिन - टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेचा रोड मॅप!

धक्कादायक! एकट्या मुंबईत टीबीचे ६६ टक्के रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या