२ कोटींच्या २ घरांसाठी १०० दावेदार

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

म्हाडाच्या १० नोव्हेंबर रोजी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात फुटणाऱ्या लाॅटरीचं काऊंटडाऊन सुरूझालं आहे. लाॅटरीला केवळ ४ दिवस उरले असून म्हाडाकडून लाॅटरीत सहभागी होणाऱ्या पात्र अर्जदारांची प्रारूप यादी सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. यंदाच्या लाॅटरीत लोअर परळमधील २ कोटींच्या घरांना कसा प्रतिसाद मिळतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार २ कोटींच्या २ घरांसाठी तब्बल १०० अर्ज सादर आल्याचं स्पष्ट झालं आहे.

किंमती पाहून खळबळ

म्हाडाकडून बऱ्याच काळानंतर दक्षिण मुंबईतील घरांचा समावेश लाॅटरीत करण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर परवडणाऱ्या दरात दक्षिण मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असं वाटत असताना म्हाडाच्या मुंबई मंडळाने या स्वप्नावरच पाणी फेरलं. कारण लोअर परळमधील ३६ पैकी २ घरांची किंमत सर्वांच भोवळ आणणारी होती.

म्हाडावर झाली टीका

लाॅटरीत ही ३६ घरे समाविष्ट झाल्यापासूनच घरांच्या किंमती नेमक्या काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. त्यानुसार सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'ने या घरांच्या निश्चित किंमती समोर आणल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली. म्हाडावर टीकाही झाली. पण महत्त्वाचं म्हणजे 'मुंबई लाइव्ह'ने घरांच्या किंमतींचा जो आकडा दिला तो तंतोतंत खरा ठरला.

इतकी किंमत

३६ पैकी २ घरांच्या किंमती १ कोटी ९५ लाख अशा असून उर्वरित ३४ घरांच्या किंमती १ कोटी ४२ लाख अशा आहेत. त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळणार नाही, अशी जोरदार चर्चा होती. तशी चर्चा काहीअंशी खरी ठरली आहे. कारण लोअर परळमधील २ कोटींच्या घरातील स्वांतत्र्य सैनिक गटासाठी १ घर राखीवर असताना या एका घरासाठी केवळ २ अर्ज सादर झाले आहेत.

तर, एक घर सर्वसाधारण गटासाठी राखीव होतं. या गटातील अर्जदारांनी मात्र या घरांवर उड्या टाकल्या आहेत. या एका घरासाठी तब्बल ९८ अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे आता हे कोट्यवधीचं घर कोण पटकवतं हे १० नोव्हेंबरलाच समजेल.


हेही वाचा-

'अभिनय' बेर्डेला हवंय म्हाडाचं घरं

म्हाडाची लाॅटरी पाहा 'फेसबुकवर लाइव्ह'वर


पुढील बातमी
इतर बातम्या